Latest

WTC Final : तर टीम इंडिया खेळणार डब्ल्यूटीसी फायनल? ‘या’ सामन्यावर सर्व काही अवलंबून

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : दिल्लीतील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. सलग दोन विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या फायनलमध्ये जाण्याची टीम इंडियाची शर्यत संपुष्टात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण याचे उत्तर तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली कसोटीत विजय मिळवल्यानंतर निश्चितपणे रोहित ब्रिगेड डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आला असला तरी, पात्रतेची या क्षणी खात्री देता येत नाही.

डब्ल्यूटीसी (WTC Final) फायनलमध्ये भारताचे स्थान किती निश्चित?

दिल्ली कसोटीत कांगारूंना पराभवाची धुळ चारल्यानंतर डल्यूटीसी गुणतालिकेत भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 64.06 इतकी झाली आहे. ते अजूनही दुसऱ्या स्थानावर आहेत. सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागल्यानंतरही, ऑस्ट्रेलिया अल्प फरकाने अव्वल स्थानी आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी 66.67 आहे.

तर भारत डब्ल्यूटीसीची (WTC Final) अंतिम फेरी गाठेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील उरलेल्या दोनपैकी एकही कसोटी भारताने गमावली आणि त्याचवेळी श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी भारताला गाठता येणार नाही. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे दोन कसोटी सामने गमावले तर रोहित ब्रिगेडची विजयाची टक्केवारी 56.94 आणि हे दोन्ही सामने अनिर्णित राहिल्यास विजयाची टक्केवारी 60.65 होईल.

त्याचवेळी श्रीलंकेने न्यूझीलंडला दोन्ही कसोटी सामन्यात हरवल्यास त्यांची विजयाची टक्केवारी 61.11 पर्यंत वाढेल. पण जर श्रीलंकेला केवळ 1-0 असा विजय मिळाला, तर त्यांचा प्रवास 55.55 टक्क्यांपर्यंत संपेल. त्यामुळे भारताचा नक्कीच फायदा होईल. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन्ही कसोटी सामने गमावल्यानंतरही भारताची विजयाची टक्केवारी (56.94) सरस असेल.

डब्ल्यूटीसी (WTC Final) फायनलमध्ये कांगारूंचे स्थान किती निश्चित?

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले तर त्यांची विजयाची टक्केवारी 59.65 होईल. त्याचवेळी श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 2-0 असा विजय मिळवल्यास, कांगारूंच्या डब्ल्यूटीच्या फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल. जर ऑस्ट्रेलियाने पुढील दोन कसोटींपैकी एकही कसोटी अनिर्णित ठेवली तर त्यांची विजयाची टक्केवारी 61.40 होईल, जी श्रीलंकेच्या 61.11 पेक्षा जास्त असेल आणि ते फायनल गाठू शकतात.

अंतिम फेरी गाठण्याची श्रीलंकेची शक्यता किती?

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याचे श्रीलंकेचे गणित अगदी सोपे आहे. त्यांना न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील आणि त्याचवेळी प्रार्थना करावी लागेल की भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल 3-1 किंवा 3-0 अशा लागणार नाही. या दोन्ही बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी श्रीलंकेपेक्षा अधिक असेल. भारताने सध्याची मालिका तीन कसोटी सामन्यांच्या कमी फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. जर भारताने कांगारूंविरुद्ध 4-0 ने मालिका विजय मिळवला तर डब्ल्यूटीसी फायनल भारत आणि श्रीलंका यांच्यात होईल. पण श्रीलंकेने किवींना दोन्ही कसोटीत मात दिल्यानंतरच हे शक्य होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT