पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याची (WTC Final) तारीख जवळ आली आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांमध्ये ही कसोटी खेळली जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांनी कंबर कसली आहे.
विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी होत आहे. याआधी जे काही कसोटी सामने खेळले गेले, ते एकतर भारतात किंवा ऑस्ट्रेलियात पार पडले. मात्र आता दोन्ही संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहचल्याने त्यांचीतील सामना इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स यांच्यासाठी 7 जूनपासून होणारा हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कसोटी ज्याने कुणी विजय मिळवला तरी दोन्ही संघाचे खेळाडू एक नवीन टप्पा गाठणार आहेत.
रोहित शर्मा दुसऱ्यांदा आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. याआधी तो 2022 च्या टी-20 विश्वचषकात कर्णधार होता. त्या स्पर्धेत भारतीय संघ सेमीफायनल पर्यंतच मजल मारू शकला होता. पण वर्षभरात रोहितला आयसीसीच्या आणखी एका स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, यापूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ आयपीएल 2023 च्या आधी भारताच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा कांगारू संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे होते. पण चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमवावे लागल्याने कांगारूंचा संघ बॅकफुटवर गेला. अशातच कौटुंबिक समस्येमुळे कमिन्स मायदेशी परतला आणि संघाची कमान स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने एक सामना जिंकला आणि एक सामना अनिर्णित राहिला. आता पुन्हा पॅट कमिन्स अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून दिसणार आहे.
दरम्यान, रोहित शर्मा त्याच्या 50 व्या कसोटीत ओव्हलच्या मैदानावर उतरणार आहे. विशेष बाब म्हणजे त्याचा प्रतिस्पर्धी कर्णधार म्हणजेच पॅट कमिन्सनेही 49 सामने खेळले आहेत आणि पुढील सामना त्याची 50वी कसोटी असेल. दोन विरोधी संघांचे कर्णधार समान संख्येने कसोटी सामने खेळून 50 वा कसोटी सामना एकत्र खेळत असल्याचे याआधी क्वचितच पाहायला मिळाले आहे.
रोहित शर्माच्या कसोटी आकडेवारीकडे नजर टाकली तर, त्याने 49 कसोटींच्या 83 डावांत फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याच्या नावावर 3379 धावा आहेत. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 9 शतके आणि 14 अर्धशतके फटकावली आहेत. कसोटीत त्याची सरासरी 45.66 आहे, तर स्ट्राइक रेट 55.94 आहे. एवढेच नाही तर त्याच्या नावावर द्विशतकही आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्स आतापर्यंत खेळलेल्या 49 कसोटींमध्ये 217 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची इकॉनॉमी 2.73 आणि सरासरी 21.50 आहे. तो सामन्यात दहा विकेट्स घेण्यात एकदा यशस्वी झाला आहे. आता दोन्ही कर्णधारांना प्रथमच आपापल्या संघांसाठी आयसीसी विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. कोणता संघ विजयाची नोंद करतो याकडे जगातील सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.