पुढारी ऑनलाईन : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव ९ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे, असे वृत्त ESPNCricinfo ने दिले आहे. तसेच मागील लिलावातून तसेच अलीकडेच बाहेर पडलेल्या खेळाडूंकडील शिल्लक रकमेव्यतिरिक्त सर्व पाच संघांना १.५ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. (WPL auction 2024 season)
९ परदेशींसह ३० स्लॉट लिलावात भरले जातील. अलीकडेच संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या कायम ठेवण्याच्या याद्या जाहीर केल्या होत्या आणि एकूण ६० खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते. या ६० खेळाडूंपैकी २१ परदेशी स्टार्स होते. २९ खेळाडूंना त्यांच्या संघातून रिलीज करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
WPL च्या सुरुवातीच्या हंगामात प्रत्येक संघाला त्यांचे संघ तयार करण्यासाठी १२ कोटी रुपये देण्यात आले होते. चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे दोनच संघ या पैशाचा वापर करू शकले. इतर तीन संघांकडे पाहता गुजरात जायंट्सकडे ५ लाख रुपये, दिल्ली कॅपिटल्सकडे ३५ लाख रुपये आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडे १० लाख रुपये (अंदाजे १२,०१५ डॉलर) शिल्लक आहेत.
गुजरात जायंट्स सुरवातीच्या हंगामात तळाशी राहिला होता. त्यांच्याकडे सर्वाधिक ५.९५ कोटी रुपये आहेत. कारण त्यांनी त्यांचा अर्धा संघ रिलीज केला होता. त्यांच्याकडे १० स्लॉट आहेत, ज्यात तीन परदेशी स्लॉट भरले जातील. यूपी वॉरियर्सने मिड टेबल पूर्ण केले आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरले. त्यांच्याकडे ४ कोटी रुपये आहेत. ज्याचा वापर ते परदेशी खेळाडूंसह पाच स्लॉट भरण्यासाठी करू शकतात.
स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन आणि एलिसी पेरी यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा गेल्या वर्षी प्रभाव पडला नाही. त्यांच्या पर्समध्ये तीन परदेशी खेळाडूंसह सात स्लॉट भरण्यासाठी ३.३५ कोटी रुपये आहेत. तर उपविजेत्या दिल्लीकडे परदेशातील एका स्लॉटसह तीन स्लॉट भरण्यासाठी २.२५ कोटी रुपये आहेत.
मुंबईच्या पर्समध्ये २.१ कोटी रुपये एवढी कमी रक्कम शिल्लक आहे. त्यांच्याकडे भरण्यासाठी पाच स्लॉट आहेत, ज्यात एक परदेशी आहे. (WPL auction 2024 season)
या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेले WPL यशस्वी ठरले होते. कारण मुंबईतील तीन ठिकाणी खेळल्या गेलेल्या २२ सामन्यांच्या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पुढील हंगामाच्या तारखा आणि ही स्पर्धा होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल की नाही याबद्दल अद्याप कोणतीही मिळालेली नाही.
गेल्या वर्षीच्या लिलावात सात खेळाडू असे होते. त्यांच्यासाठी २ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण तिघींनी तीन कोटींचा टप्पा ओलांडला होता. यात स्मृती मानधना (आरसीबीसाठी रु. ३.४ कोटी), ॲशलेघ गार्डनर (गुजरात जायंट्ससाठी रु. ३.२ कोटी) आणि नॅट सायव्हर-ब्रंट (MI साठी ३.२ कोटी) यांचा समावेश होता.