Latest

WPL 2024 : स्मृतीच्या नेतृत्वात RCBचा विजय; विराटला जमले नाही ते सांगलीच्या लेकीने करून दाखवले

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आयपीएलचा 17 वा हंगाम अवघ्या काही दिवसात सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्याआधी बंगळुरू संघाच्या चाहत्यासाठी क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी येत आहे. आज झालेल्या वुमन्स प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्लीचा 8 विकेट राखून पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आयपीएलच्या 16 वर्षांत विराटसह अनेक दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने शानदार कामगिरी केली आहे. परंतु, त्यांना आयपीएलचे जेतेपद जिंकता आले नव्हते. मात्र, वुमन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्याच हंगामात जेतेपद पटकवल्यामुळे जे विराटला जमल नाही ते स्मृतीने करून दाखवले. अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये  होत आहे. (WPL 2024)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आज झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. या विजयासह बंगळुरूने स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकावले.

बंगळुरूच्या पुरुष संघाने आजपर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्याच हंगामात विजय मिळवला. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डिव्हाईन आणि स्मृती मानधना यांनी संघाला वेगवान खेळी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागिदारी केली. शिखा पांडेने 32 धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून ही भागीदारी फोडली. यानंतर कर्णधार मानधनाने डावाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र, मिन्नू मणीने तिला 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. (WPL 2024)

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला करणाऱ्या दिल्लीला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली.

मात्र दिल्लीच्या डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज मोलिनक्सने सामन्याला निर्णयक वळण दिले. तिने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचे कंबरडे मोडले. यानंतर श्रेयंका पाटीलचा कहर पाहिला मिळाला. यात सलामीवीर शेफाली वर्माचे अर्धशतक हुकले. आक्रमक फलंदाजी करताना तिने 27 चेंडूत 44 धावा केल्या. यात तिने 2 चौकार आणि 3 षटकार लगावले.

त्यानंतर 11व्या षटकात श्रेयंकाने कर्णधार लॅनिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिने 23 चेंडूंत तीन चौकारांसह 23 धावा करता केल्या. राधा यादव (12) 17व्या षटकात धावबाद झाली. मॅरिझान कॅप (8), जेस जोनासेन (3), मिन्नू मणी (5) आणि यष्टिरक्षक तानिया भाटिया (0) यांनाही मोठी खेळी खेळता आली नाही. अरुंधती रेड्डी (10) आणि भाटिया यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत श्रेयंकाने 19व्या षटकात दिल्लीचा डाव गुंडाळला.

दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद 64 धावा करणारा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. आणि 113 धावांवर ऑलआऊट झाला. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट्स घेतल्या होत्या तर राधा यादव धावबाद झाली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT