Latest

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने WPL च्या पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खेळीने इतिहास रचला. या सामन्यात तिने 14 चौकारांच्या सहाय्याने 30 चेंडूत 65 धावा फटकावल्या. हरमनप्रीतची ही वादळी खेळी पाहून मैदानात बसलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. तसेच आपल्या कर्णधार खेळीच्या जोरावर मुंबई संघाला 207 धावांपर्यंत पोहोचवले.

हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) आपल्या खेळीने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात अर्धशतक झळकावताच मोठा विक्रम केला. महिला प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक ठोकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 216.67 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या खेळीच्या जोरावर तिचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले. या खेळीदरम्यान हरमनने स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले.

हरमनप्रीत कौर जबरदस्त फॉर्ममध्ये

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी केली. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. त्या सामन्यात हरमनप्रीत धावबाद झाली आणि भारताने सामना गमावला. आता तिने आपला फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी कायम ठेवत चांगला संकेत दिला आहे. याचा फायदा तिला मोसमात होणाऱ्या सामन्यांमध्ये मिळेल. हरमनप्रीत कौरशिवाय मुंबईकडून हेली मॅथ्यूजने 47 आणि अमेलिया कारने 45 धावा केल्या. या तिघींच्या दमदार खेळीमुळे मुंबई संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT