Latest

हिऱ्याच्या किंमतीची ‘चहा पावडर’; गंभीर आजार बरे होण्याएवढे त्‍यात काय आहे की ती एवढी महागडी आहे?

Arun Patil

नवी दिल्ली : रस्त्यावर एका चहा कटिंगची किंमत पाच ते दहा रुपये इतकी असते. महागड्या ब्रँडची चहा पिणारे शौकीन काही हजार रुपये किंमतीची चहा पावडर विकत घेतात. मात्र, एका चहा ब्रँडची किंमत कोट्यवधीत असेल, असे कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाने होते. बाजारात विविध प्रकारचे, विविध किमतीचे चहाचे ब्रँड उपलब्ध आहेत. या ब्रँडच्या किमतीही तगड्या असतात. जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. थोडक्यात सांगायचे तरएका हिर्‍याच्या किमतीएवढी चहाची किंमत आहे. ही चहा पावडर तब्बल 9 कोटी रुपये किलो दराने विकली जाते. कारण, ती साधारण नाही. या चहामुळे गंभीर आजार बरे होतात असा दावा करण्यात आला आहे. ही चहा पावडर एवढी महाग का आहे गंभीर आजार बरे होण्याएवढे त्यात काय आहे की ती एवढी महागडी आहे?

या महागड्या चहा पावडरचे नाव आहे दा-होंग पाओ टी आहे. चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात तिचे उत्पादन केले जाते. विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते. चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे असल्याने ती दुर्मीळ झाली आहेत. त्यामुळे या झाडांकडून वर्षभरात अल्प प्रमाणात चहा पावडर मिळते. दा-होंग पाओ टीची पाने अतिशय कमी असतात. चहा आरोग्यदायी असून, गंभीर आजारांवर तो परिणामकारक ठरतो, असे सांगितले जाते. त्यामुळे या चहाची किंमत कोट्यवधीत असली तरी जगातील धनवान व्यक्ती या महागड्या चहाचा आस्वाद घेतात.

आणखी एक महागडा ब्रँड 

चीनमधील चहाचा आणखी एक ब्रँड जगप्रसिद्ध आहे. पांडाच्या शेणापासून जे खत तयार होते, ते चहाच्या मळ्यात वापरण्यात येते. या मळ्यात तयार होणार्‍या एक किलो चहाची किंमत आहे 57 लाख रुपये. या मालिकेतील तिसरा महागडा चहा सिंगापूरचा आहे. याचे पान सोनेरी रंगाचे असते. वर्षांतून एकदाच या दुर्मीळ चहाचे पीक घेतले जाते. या सोनेरी चहासाठी प्रतिकिलो तुम्हाला 6 लाख रुपये मोजावे लागतील. याशिवाय आपल्या भारतात तयार होणारा सिल्व्हर टीप्स इम्पेरियल टी या ब्रँडचा हा चहा जगातील चौथा सर्वात महागडा आहे. त्याची पाने केवळ पौर्णिमेच्या रात्रीच तोडण्यात येतात. दार्जिलिंगच्या मळ्यात याचे उत्पादन घेतले जाते. या किलो चहासाठी दीड लाख रुपये मोजावे लागतात.

SCROLL FOR NEXT