वॉशिंग्टन : सोन्यासारख्या राजधातूचे आकर्षण जुन्या काळापासूनच माणसाला आहे. सोन्याच्या साठ्यावर एखाद्या देशाची अर्थव्यवस्थाही अवलंबून असते. जगातील सर्वात मोठी सोने भरलेली तिजोरी कुठे आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? अशी तिजोरी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये आहे. अर्थात, या तिजोरीत केवळ अमेरिकेचेच सोने आहे, असे नाही!
फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या गोल्ड वॉल्टमध्ये 4 लाख 97 हजार गोल्ड बार म्हणजेच सोन्याच्या विटा आहेत. या तिजोरीत अमेरिकन सरकार, विदेशी सरकारांसमवेत अन्य केंद्रीय बँका आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 6,190 टन सोने आहे. सोन्याची ही जगातील सर्वात मोठी तिजोरी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये जमिनीखाली 80 फूट खोलीवर सुरक्षित आहे. जगात आतापर्यंत जितके सोने बाहेर काढण्यात आले आहे त्यापैकी 5 टक्के सोने या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
त्यामध्ये सुमारे 7 हजार टन ग्लिटरिंग गोल्ड बार आहेत. न्यूयॉर्क फेडचे गोल्ड वॉल्ट मॅनहॅटनमधील आपल्या मुख्यालयाच्या तळघरात आहे. या तिजोरीची निर्मिती 1920 च्या दशकात इमारतीच्या बांधकामावेळीच झाली. हे वॉल्ट खातेधारकांना आपले सोने सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण देते. या वॉल्टचे डिझाईन फ्रेडरिक एस. होलम्स यांनी बनवले होते. तिथे सोन्याचे वजन करण्यासाठी एक अनोखे स्केल आहे. त्यावर जास्तीत जास्त 640 पौंड आणि कमीत कमी 1/ 100 औंस सोन्याचे वजन करता येते.