Latest

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं जगातील सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक, नेमकं कसं झालं नष्ट?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात (Russia-Ukraine War) जगातील सर्वात मोठं विमान एएन२२५ (AN225) जळून खाक झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात नष्ट झालेले विमान हे कार्गो विमान होतं. हे सहा इंजिने असलेले विमान असून ते नष्ट झाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. युक्रेनमधील अँटोनोव्ह विमान कंपनीने या मॉडेलच्या केवळ एकमेव विमानाची निर्मिती केली होती.

एका छायाचित्राच्या आधारे, AN-225 नष्ट झाल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. ज्यामध्ये विमान बॉम्बस्फोटाने नष्ट होत असल्याचे दिसून आले होते. छायाचित्रात एक मोठे विमान हँगरच्या खाली वक्र छतासह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसते. शीट-मेटलच्या वक्र छताला भेदून विमानावर क्षेपणास्त्र आदळल्याचेही यावरून स्पष्ट होते.

हे विमान राजधानी युक्रेनची राजधानी कीव्ह जवळील हॉस्टोमेल विमानतळावर अखेरचे पार्क करण्यात आले होते, ज्याला अँटोनोव्ह आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. हे राजधानी कीव्ह शहराच्या उत्तर-पश्चिम उपनगरातील हॉस्टोमेल गावात स्थित आहे.

सोशल मीडिया युजर्संनी हे छायाचित्र AN225 चे असल्याचे म्हटले होते आणि ते खरे ठरले आहे. ज्या ठिकाणी हे विमान ठेवले (हँगर) होते तेथे वक्र छप्पर होते. पण हल्ल्यात हे विमान नष्ट झाले आहे. शिवाय, असे दिसते की आग लागलेल्या विमानाच्या एका पंखावर तीन इंजिन आहेत आणि फोटोमध्ये दिसत असलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये AN225 हे एकमेव सध्याचे विमान आहे ज्यामध्ये सहा जेट इंजिने आहेत.

विमान निर्मिती करणाऱ्या अँटोनोव्ह कंपनीने सांगितले होते की त्यांना विमानाच्या सध्याच्या अचूक स्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही. ट्विटरवर व्यक्त झालेल्या अंदाजावर प्रतिक्रिया देताना, कंपनीने एएन225 नष्ट झाल्याची पुष्टीही केली नाही आणि ती नाकारलीही नाही. त्यांनी अधिकृत माहिती येईपर्यंत अधिक बोलणे टाळले होते.

सदर विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे याबाबत अधिक माहिती नसण्याचे कारण म्हणजे हे विमानतळ रशियन सैन्याने ताब्यात आहे. अँटोनोव्ह विमानतळ ताब्यात घेण्याचा २४ तारखेचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने अँटोनोव्ह विमानतळ ताब्यात घेतला होता. या विमानाची धावपट्टी अवजड विमानांना लँडिंग करण्यासाठी सक्षम आहे. यामुळे रशियाला आता सैन्य आणि अवजड लष्करी यंत्रणा थेट राजधानी कीव्हच्या बाहेरील भागात नेता येणार आहे.

२६ फेब्रुवारी रोजी कंपनीने सांगितले होते की त्यांच्याकडे मृया नावाच्या AN225 बद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. २४ तारखेला अखेरच्या मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर रशियन हल्ल्यापूर्वी हे विमान सुरक्षित असल्याचे कंपनीने सांगितले होते.
तथापि, विमानतळ आधीच रशियाच्या ताब्यात गेल्याने, विमानतळावरील त्याच्या हँगरवर उभ्या असलेल्या AN225 या कार्गो विमानाचे नुकसान कसे झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही नेटिझन्सनी असा अंदाज व्यक्त केला आहे की युक्रेनच्या क्षेपणास्त्राने ते अनावधानाने नष्ट झाले असावे. युक्रेनियन सैन्याने विमानतळ पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांचे एक क्षेपणास्त्र AN225 हँगरवर आदळले असावे, असा अंदाज वर्तविला जात होता. रशियन सैन्याने हे विमान नष्ट केले असण्याचीही शक्यता असली तरी आता युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याला रशियाच जबाबदार (Russia-Ukraine War) असल्याचे म्हटले आहे.

कसं होतं हे अवाढव्य विमान….

Antonov AN225 Mriya या विमानाची निर्मिती १९८५ मध्ये युक्रेनमध्ये अँटोनोव्ह कंपनीने केली होती. हे आतापर्यंतचे निर्मित सर्वात वजनदार विमान आहे आणि त्याचे पंख सर्वात लांब आहेत. या अवाढव्य विमानात सहा टर्बोफॅन इंजिने आणि त्याला ३२ चाके आहेत. या विमानाचा वापर मालवाहतुकीसाठी केला जातो. हे विमान आता नष्ट झाले आहे. ते युद्धात नष्ट झाल्याने विमान वाहतूक इतिहासातील एका गौरवशाली अध्यायाचा दुःखद अंत झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT