पुणे : आशिष देशमुख : सर्वच महासागरांच्या पोटात मानवनिर्मित प्लास्टिकच्या कचर्याचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे समुद्राखालची मोठी जीवसृष्टी नामशेष होत आहे. जमिनीवरच्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. आकाशात उडणार्या हजारो पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे 2040 पर्यंत 60 टक्के प्लास्टिकचा वापर कमी करावा, अशी आर्त हाक यंदाच्या जागतिक वसुंधरादिनी संयुक्त राष्ट्र संघाने जगाला दिली आहे.
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. 1970 पासून हा दिवस साजरा होतो. या दिवशी पृथ्वी वाचविण्यासाठी काय करता येईल त्यानिमित्त जगभरातील पर्यावरणरक्षण करणार्या संस्था एकत्र येऊन काम करतात. यंदा 2040 पर्यंत 60 टक्के प्लास्टिकचा वापर कमी करा, अशी थीम पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. पृथ्वीवरील बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेला प्लास्टिकचा वापर, ही सर्वांत मोठी समस्या मानवाने पृथ्वीसमोर उभी केली आहे.
मानवाने टाकलेला प्लास्टिकचा कचरा नदी-नाले आणि शेवटी महासागरात जात आहे. त्यामुळे माशांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. समुद्राखालची जीवसृष्टीच प्लास्टिक संपवत आहे. हजारो माशांच्या जाती नामशेष झाल्याचा अहवाल अमेरिकेतील विद्यापीठांनी दिला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, जगातील सर्वच महासागराच्या पोटात मोठे प्लास्टिकचे डोंगर आहेत. त्यामुळे आता प्लास्टिकचा वापर मर्यादित करा, अशी हाक यंदा त्यांनी दिली आहे. समुद्राखालची जीवसृष्टी धोक्यात आहे. त्याचा अहवाल भयंकर आहे. पाण्याखालच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पृथ्वीवरच्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन जनावरे मरत आहेत. यात सर्वाधिक गायी, म्हशी, जंगलातील सर्वंच प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जात आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आता पक्षी देखील त्यांची घरटी बांधण्यासाठी प्लास्टिकचे धागे, टाकाऊ वस्तूंचा वापर करीत आहेत; इतका प्लास्टिकचा कचरा आपल्या अवतीभोवती झाला आहे.
आपण घरापासून प्लास्टिक कमी करून पृथ्वीचे रक्षण करू शकतो. प्लास्टिकच्या कुंड्यांऐवजी मातीच्या कुंड्या वापराव्यात. बाजारात जाताना मी पॉलिथिन बॅग घेणार नाही, असा संकल्प केला तर खूप मोठा प्लास्टिकचा वापर कमी होईल.
– भाविशा बुद्धदेव, ( पर्यावरण बचाव कार्यकर्त्या )
.