Latest

क्रीडा : अपेक्षांचे ओझे… संकट नव्हे, संधी!

Arun Patil

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदासाठी यजमान भारत प्रबळ दावेदारांमध्ये गणला जातो आहे. आता क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ जरूर आहे; पण संघातील खेळाडूंनी आपला लौकिक पणाला लावला आणि येणार्‍या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा वसा घेतला, तर जेतेपद प्रत्यक्षात साकारणे निश्चितच शक्य असेल. स्पर्धा भारतातच होत असल्याने संघावर अपेक्षांचे ओझे असणारच; पण हे अपेक्षांचे ओझे संकट न मानता, त्याचे परिवर्तन संधीत केले, तर यामुळेदेखील जेतेपद फारसे दूर नसेल!

काही दिवसांपूर्वी कपिल देवची एक छान टिपणी चर्चेत आली होती. कपिल त्यावेळी म्हणाला होता की, 'भारत यंदाचा विश्वचषक जिंकू शकेल; पण यासाठी रोहितसेनेने अपेक्षांचे ओझे व्यवस्थित हाताळायला हवे.'

खरे आहे ते; पण त्यासाठी मुळातच याच कपिलकडून भारतीय खेळाडूंनी तंदुरुस्तीचे धडे गिरवायला हवेत. याचे कारण असे की, 131 कसोटी व 225 एकदिवसीय सामने खेळणार्‍या कपिलला दुखापत झाली म्हणून एकाही सामन्यातून बाहेर बसावे लागले नाही. कपिल प्रत्येक सामन्यात त्याच हिरिरीने उतरला, जसा यातील प्रत्येक सामना हा त्याचा पहिलाच सामना होता!

याउलट, आताची परिस्थिती आहे. बुमराह जवळपास वर्षभरापासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. कधी के. एल. राहुल जायबंदी होतो, कधी श्रेयस अय्यर तंदुरुस्त नसल्याने मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जातो. बर्‍याच खेळाडूंना दुखापतीची समस्या तर असतेच. शिवाय, त्यांचे तळ्यात-मळ्यातील स्थान त्यांच्या मनोबलाचे अधिक खच्चीकरण करते. फरक इतकाच की, कपिलपर्वादरम्यान आजच्याइतके क्रिकेट खेळले जात नव्हते आणि आज वर्षाकाठी 10 महिने क्रिकेट अविरत सुरू असते. यामुळे कपिल म्हणतो, त्याप्रमाणे तंदुरुस्तीचे व्यवस्थापनही सुव्यवस्थित करायला हवे.

कपिलच्या उमेदीच्या कालावधीतील परिस्थिती आणि आताची अत्याधुनिक स्थिती, यातही खरं तर जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कपिल खेळत असताना विंडीजसारखा पॉवरहाऊस संघ 1970-80 च्या दशकात एककलमी वर्चस्व गाजवत होता. त्यावेळी कपिलने या वर्चस्वाला एककलमी खिंडार पाडण्याचे कर्तव्य अगदी इमानइतबारे पार पाडले आणि तेही 1983 च्या विश्वचषकातच! नेमके त्यापासूनच रोहितसेनेने आता 2023 मध्ये आदर्श घेण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे!

आता 1983 व 2011 या दोन जेतेपदांची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असेल तो म्हणजे खेळाडूंचा फॉर्म आणि आपल्या सुदैवाने महत्त्वाचे खेळाडू सध्या बर्‍यापैकी बहरात आहेत. भारताने मागील 18 वन-डे सामन्यांत 15 विजय नोंदवले आहेत. सर्वच खेळाडू एकजिनसी खेळ साकारत आहेत आणि याहून महत्त्वाचे म्हणजे, यंदाचा आयसीसी विश्वचषक आपल्याच घरच्या मैदानात खेळवला जातोय!

एखादी प्रतिष्ठेची स्पर्धा घरच्या मैदानावर असते, त्यावेळी चाहत्यांचे दडपण असतेच असते; पण याचमुळे खेळाडूंना स्फूरण चढते, तेही महत्त्वाचे. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या मागील विश्वचषक स्पर्धेत बेन स्टोक्ससारख्या अव्वल खेळाडूचा खेळ बहरला होता, तो अशा चाहत्यांच्या उत्स्फूर्त पाठबळामुळेच. याच पार्श्वभूमीवर, यंदाच्या विश्वचषकात स्वदेशात खेळणार्‍या विराट कोहलीसारख्या अव्वल खेळाडूचा खेळ बहरला, तर ते स्वागतार्हच!

संघाची लाईनअप पाहता, रोहित-शुभमन गिलसारख्या तडाखेबंद सलामीवीरांचा अनुभव व युवा जोश यांचा मिलाफ साधणारा दुवा भारताचे तगडे बलस्थान असणार आहे. शिवाय, तिसर्‍या स्थानी विराट कोहलीचा एक्स फॅक्टर आहेच! एकीकडे, रोहित-शुभमन यांनी एकत्रित खेळलेल्या 13 सामन्यांत सलामीला 1 हजारहून अधिक धावांची आतषबाजी 87 च्या आक्रमक सरासरीने केली आहे, तर दुसरीकडे, विराटदेखील आपल्या सर्वोच्च बहरात आहे.

यातील शुभमन गिल आक्रमक आहे. कोणत्याही गोलंदाजाचा हवा तसा समाचार घेण्याची हातोटी त्याच्याकडे आहे. शिवाय, 2011 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली ज्या तडफेत होता, तीच तडफ 24 वर्षीय गिलच्या खेळात आढळून येते. 2011 मधील त्या फायनल लढतीत जेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विराटने सचिनला खांद्यावर उचलून घेतले होते. आता तीच बॅटन पुढे नेण्याची जबाबदारी यंदा शुभमनवर असेल.

सलामीनंतर महत्त्वाच्या वन-डाऊन पोझिशनवर विराट फलंदाजीला उतरतो, त्यावेळी अवघ्या क्रिकेट जगताच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात, हे सर्वश्रुत आहे. कठीण प्रसंगी, प्रतिकूल परिस्थितीत विराटचा खेळ हमखास बहरतो, हा इतिहास यंदाही आपली जमेची बाजू असेल. 2019 विश्वचषकानंतर विराटने 40 सामन्यांत 1,741 धावांचे योगदान दिले आहे. यादरम्यान, त्याची सरासरी 47 इतकी राहिली असून, यात 11 अर्धशतके व 6 शतकांचा समावेश राहिला आहे. डावाला आकार देण्याची क्षमता आणि एकहाती सामना जिंकून देणारा खेळ साकारण्याची धमक, यामुळेही विराट कोहली आणखी एकदा भारतीय संघासाठी बलस्थान असणार आहे. तसे पाहता, भारताकडे आघाडीचे फलंदाज तगडे असण्याची परंपरा पूर्वांपार आहे; पण सारी गफलत मध्यफळीतच होत असे. यावेळी मात्र सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, इशान किशन, श्रेयस अय्यरसारखे खेळाडू संघात असल्याने मध्यफळीत फारशा चिंतेचे कारण नसेल, अशी आशा आहे. या सर्व खेळाडूंनी यापूर्वी दडपण व्यवस्थित हाताळत संघाची नौका विजयाच्या पैलतीरी पोहोचवण्याची धमक सातत्याने दाखवली आहे, तो दाखलाही सोबतीला आहेच.

अष्टपैलू खेळाडूंच्या आघाडीवर, हार्दिक पंड्या व रविंद्र जडेजा लक्षवेधी योगदान देऊ शकतात. शिवाय, रविचंद्रन अश्विनचा अनुभवही मोक्याच्या क्षणी निर्णायक ठरू शकतो. गतवर्षी ऑक्टोबरमध्येच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत याच अश्विनने नवाजचा एक वाईड चेंडू वेळीच सोडून देत त्यानंतर शेवटचा चेंडू सर्कलवरून भिरकावून देत भारताला पाकिस्तानविरुद्ध कसा देदीप्यमान विजय मिळवून दिला होता, त्याची आठवण दर्दी क्रिकेट रसिकांच्या मनात आजही तितकीच ताजी आहे.

जलद-मध्यमगती गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, सिराज, शार्दूल ठाकूर तसेच फिरकी गोलंदाजीत कुलदीप-अश्विन यांच्यामुळे तेथेही फारशी चिंता नाही. अर्थात, इतके सारे काही असतानाही आठवण येते ती 'द ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीची. तगडे सलामीवीर, मजबूत मधली फळी, एकापेक्षा एक सरस अष्टपैलू, उत्तमोत्तम गोलंदाज इतके सर्व काही आहे; पण यात प्रकर्षाने उणीव जाणवते ती या धोनीसारख्या कसलेल्या फिनिशरची!

या फिनिशरची उणीव संघातील मोहर्‍यांनी भरून काढली, तर 1983 व 2011 मधील जेतेपदाची येथे निश्चितपणाने पुनरावृत्ती होईल. यादरम्यान, माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने अतिशय धारदार टिपणी केली होती. तो म्हणाला होता, 'माझ्या मते, जो संघ भारताला नमवेल, तोच विश्वचषक जेतेपदाचा खराखुरा हक्कदार असेल!'

20 वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये भारत विश्वचषक विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होता. संघ फायनलपर्यंत धडकला होता; पण फायनलमध्ये अपेक्षांचे ओझे भारतीय संघाला मानवले नाही आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हातातोंडाशी आलेला विश्वचषक विजयाचा घास पळवला नसता तरच नवल होते!

यंदा त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर कपिल म्हणतो त्याप्रमाणे अपेक्षांचे ओझे व्यवस्थित हाताळायला हवे. अपेक्षांना ओझे किंवा संकट नव्हे, तर संधी म्हणून पाहायला हवे. असे केले तरच जो सन्मान 1983 मध्ये कपिल व 2011 मध्ये एम. एस. धोनीला लाभला, त्याची रोहितला अपेक्षा करता येईल. सरतेशेवटी, रोहितसाठीदेखील हा शेवटचाच विश्वचषक असणार आहे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT