पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : वनडे विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. उपांत्य फेरीत भारत, द. अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी, तर तर 16 नोव्हेंबरला द. आफ्रिकेची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दरम्यान, या बाद फेरीतील सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर काय होणार? कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत-न्यूझीलंड हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. पण काही दिवसात मुंबई येथे हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर काय होईल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती नाही, कारण आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसांची व्यवस्था केली आहे. म्हणजेच उपांत्य किंवा अंतिम सामना एका दिवसात पूर्ण झाला नाही तर तो पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथून पुढे दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळवला जाईल. आणि जर सामना राखीव दिवशीही पूर्ण होऊ शकला नाही तर गुणतालिकेत अव्वल असणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थीनी आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे सहाजिकच रोहित सेना अंतिम फेरी गाठेल. त्याचप्रमाणे द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर द. आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल. कारण गुणतालिकेत द. आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित सेनेकडे वर्ल्डकप जेतेपदाचा गेल्या 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारताने 10 वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही.