Latest

World Athletics Championships 2023 :विश्व अ‍ॅथलेटिक्सला उद्यापासून सुरुवात; भारत सुवर्णपदक जिंकणार? या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

सोनाली जाधव

विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 40 वर्षांच्या इतिहासात भारत आजवर एकदाही सुवर्णपदक जिंकू शकलेला नाही. मात्र, यंदा नीरज चोप्राकडून सर्वाधिक अपेक्षा आहे. 19 ऑगस्टपासून खेळवल्या जाणार्‍या या स्पर्धेत नीरज चोप्राशिवाय श्रीशंकर, एल्डहॉस व अविनाश साबळे हे देखील चमत्कार घडवू शकतात. (World Athletics Championships 2023)

  • स्पर्धेचा कालावधी : 19 ते 27 ऑगस्ट
  • ठिकाण : बुडापेस्ट, हंगेरी.
  • सहभागी भारतीय अ‍ॅथलिट : 28
  • सर्वात युवा भारतीय : शैली सिंह (19 वर्षे)
World Athletics Championships 2023: पदकांसाठी भारताचे प्रबळ दावेदार
एल्डहॉस पॉल
2022 राष्ट्रकुल स्पर्धेतील तिहेरी उडी इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकत एल्डहॉस पॉलने एकच खळबळ उडवून टाकली होती. याशिवाय, अब्दुला अबुबकरने देखील रौप्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. एकाच स्पर्धेत तीनपैकी दोन पदके भारताने जिंकण्याची ही एखाद्या स्पर्धेतील पहिलीच वेळ होती. आश्चर्य म्हणजे, त्या इव्हेंटमध्ये प्रवीण चित्रावलचे कांस्य अगदी किंचित फरकाने हुकले होते.
मुरली श्रीशंकर
मुरली श्रीशंकर

मुरली श्रीशंकर
लांब उडीत यंदा श्रीशंकर व जेस्विन एल्ड्रिन या दोघांनाही पदक जिंकण्याची संधी असेल. या हंगामात श्रीशंकर व एल्ड्रिन हे दोघेही उत्तम बहरात आहेत. यापैकी जेस्विनने इंडियन ओपन चॅम्पियनशिपमध्ये 8.42 मीटर्सची उडी घेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. श्रीशंकरने देखील जूनमध्ये भूवनेश्वरमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत ८.४१ मीटर्सची उडू घेतली आहे.

ज्योती याराजी

100 मीटर्स अडथळ्याच्या शर्यतीत ज्योती याराजी ही देखील पदकाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मूळ विशाखापट्टणमची ही 23 वर्षीय अ‍ॅथलिट हा इव्हेंट अवघ्या 13 सेकंदात धावून पूर्ण करणारी एकमेव भारतीय आहे. तिचे वडील सुरक्षारक्षक राहिले आहेत, तर आईने घरकाम करून ज्योतीला अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा दिली. तिने जुलैमध्ये संपन्न झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकले. महाविद्यालयीन खेळात हा इव्हेंट 12.78 सेकंद इतक्या कमी वेळात पूर्ण करण्याचा विक्रम देखील तिच्या खात्यावर नोंद आहे.

अन्नू राणी

अन्नू राणी
उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील युवा महिला भालाफेकपटू अन्नू राणी ही देखील फारशी मागे अजिबात नाही. उलटपक्षी, 60 मीटर्सचा माईलस्टोन पार करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या खात्यावर राष्ट्रीय विक्रम आहे. 2019 विश्व चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय भालाफेकपटूही ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराज्य स्पर्धेत तिने 63.24 मीटर्सची फेक करत नवा विक्रम प्रस्थापित केला. आता यापेक्षाही सरस कामगिरी विश्व चॅम्पियनशिपमध्ये करण्याचा तिचा मानस असणार आहे.

शैली सिंह
भारताची दिग्गज अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिची 19 वर्षीय शिष्या शैली सिंह यंदाच्या स्पर्धेत निर्धाराने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. आता एखाद्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची तिच्यासाठी ही पहिलीच वेळ असेल. मात्र, आजवर घेतलेले परिश्रम येथे सार्थकी लागतील, असा तिचा मानस आहे. 2017 मध्ये ती 14 वर्षांची असताना तिला अंजू व तिचे पती रॉबर्ट यांनी प्रशिक्षण दिले होते. शैली विश्व अ‍ॅथलेटिक्स यू-20 स्पर्धेत रौप्यपदकाची मानकरी ठरली होती. आता पुन्हा एकदा पोडियमवर परतण्याची तिची महत्त्वाकांक्षा असणार आहे. एप्रिलमध्ये आयोजित इंडियन ग्रा.प्रि.स्पर्धेतही ती अजिंक्य ठरली होती.

अविनाश साबळे
भारताचा हा दिग्गज अ‍ॅथलिट 3 हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार ठरू शकतो. त्याने आजवर आपला राष्ट्रीय विक्रम 9 वेळा सुधारला आहे. सेनेचे प्रतिनिधित्व करणार्‍या साबळेने यापूर्वी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकले होते. त्याचवेळी तो 1994 नंतर पोडियमवर पोहोचणारा पहिला बिगर केनियन अ‍ॅथलिट ठरला होता. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 8:11.20 इतकी आहे.

  • 3 हजार मीटर्स स्टीपलचेस : यंदा बुडापेस्ट स्पर्धेत तिसर्‍यांदा एखाद्या विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचा साबळेचा प्रयत्न असेल.
    अविनाश साबळेचे हंगामातील प्रदर्शन
    स्पर्धा                                 वेळ          क्रमांक
    डायमंड लीग रॅबॅट               8:17.08    दहावा
    डायमंड लीग स्टॉकहोम        8:21.88     पाचवा
    डायमंड लीग सिलेसिया        8:11.63    सहावा

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी
पदक : रौप्य
नोंदवलेली वेळ : 8:11.20

अविनाश साबळेने सिलेसिया डायमंड लीगमध्येच 8:15.00 चा क्वॉलिफाईंग मार्क पार करत पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.

SCROLL FOR NEXT