Latest

Women’s T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा विजयरथ द. आफ्रिका रोखणार?

Arun Patil

केप टाऊन, वृत्तसंस्था : सातपैकी पाच विश्वविजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलियन महिला संघ सहाव्या विजेतेपदासाठी सज्ज झाला असून, तो सातव्यांदा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहेे; तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे. विश्वविजेतेपदाचा षटकार (Women's T20 World Cup) मारण्यापासून ते ऑस्ट्रेलियाला रोखतात का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

विश्वचषक स्पर्धेेची ही सातवी आवृत्ती असून, ऑस्ट्रेलियाही सातव्यांदा अंतिम फेरीत खेळत आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात भारताला पाच धावांनी हरवून फायनल गाठली आहे; तर दुसरीकडे मायदेशात खेळत असलेला दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. शुक्रवारी झालेल्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात त्यांनी इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवला.

इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज यासारखे बलाढ्य देश अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरले असताना, दक्षिण आफ्रिकेने मात्र फायनल गाठत सर्वांना चकित केले. गेल्यावर्षी वन-डे विश्वचषकात सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने वर्षभरात चांगली प्रगती केली असून, पहिले विश्वविजेतेपद त्यांच्या आवाक्यात आले आहे. त्यांच्या संघाची बांधणी चांगली झाली आहे. लॉरा वोल्व्हार्ट आणि ताझमिन ब्रिटस् ही सर्वोत्कृष्ट जोडी त्यांच्या डावाची सुरुवात करते आहे. (Women's T20 World Cup)

या दोेघींची कामगिरी चांगली झाली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते चांगली धावसंख्या उभी करतील. अष्टपैलू मरिझन काप्प हिच्यावरही संघाची बरीच मदार असेल. शबनीम इस्माईल आणि आयाबोंगा खाका या गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करीत आहेत. या सर्वांची कामगिरी जर अंतिम सामन्यात उंचावली तर कर्णधार सून लूस हिच्या हातात विश्वचषक दिसण्यात काहीच अडचण येणार नाही.

सातव्यांदा फायनल खेळणार्‍या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना म्हणजे काही वेगळा खेळ नसेल. यापूर्वी लीग सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला सहज हरवले होते; पण ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेऊन चालणार नाही.

द. आफ्रिका : सून लूस (कर्णधार), च्लो ट्रॉयॉन (उपकर्णधार), अ‍ॅनेके बॉश, ताझमिन ब्रिटस्, नादिन-डी-क्लर्क, अ‍ॅनेरी डेरेक्सन, लारा गुडाल, शबनीम इस्माईल, सिनालो जाफता, मरिझन काप्प, आयाबोंगा खाका, मेरी क्लास, एन. मलाबा, डेल्मी टकर, लॉरा वोल्व्हार्ट.

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), अ‍ॅलिसा हेली (उपकर्णधार, यष्टिरक्षक), डॅर्सी ब्राऊन, अ‍ॅश्लेग गार्डनेर, किम गार्थ, हिदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जॉन्सेन, अ‍ॅल्ना किंग, ताहिला मॅकग्राथ, बेथ मूनी, इलिस पेरी, मेगन स्कट.

SCROLL FOR NEXT