Latest

 महिला आरक्षण हा भारताच्या संसदीय प्रवासातील सुवर्ण क्षण : पंतप्रधान मोदी

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम हे महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे हा भारताच्या संसदीय प्रवासातील सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन आज लोकसभेत केले. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील सर्व सदस्यांचे मनापासून आभारही मानले.

लोकसभेमध्ये काल (२० सप्टेंबरला) महिला आरक्षण विधेयक सरकारतर्फे मांडण्यात आले होते. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक सात तासाहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले होते. या १२८ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर झालेल्या मतदानात, विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली.तर विरोधात दोन मते पडली होती. आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षणावर छोटेखानी मनोगत व्यक्त करून सर्व सदस्यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की कालचा दिवस भारताच्या संसदीय प्रवासाचा सुवर्ण क्षण होता. या सभागृहातील सर्व सदस्य त्या सुवर्ण क्षणाबद्दल अभिनंदनासाठी पात्र आहेत. आज राज्यसभेत विधेयक संमत होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. यातून देशाच्या मातृशक्ती मध्ये अभूतपूर्व बदल होणार असून यातून निर्माण होणारा आत्मविश्वास एक अकल्पनीय शक्ती म्हणून उदयास येईल आणि देशाला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT