Latest

Womens IND vs SL Final : श्रीलंकेचा फलंदाजांची हाराकिरी, ६५ धावांवर डाव आटोपला

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने सुमार कामगिरीचे दर्शन घडविले. अवघ्या ६५ धावांमध्ये श्रीलंकेने आपले ९ गडी गमावले. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकन संघाचा डाव ६५ धावांवर पत्यासारखा कोसळला. (Womens IND vs SL Final)

आता भारतीय महिला संघाला आशिया चषक संघ आपल्या नावावर करण्याची संधी आहे. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि श्रीलंकन महिला संघ आतापर्यंत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. या पाचही सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेच्या संघाला पराभूत केले. आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने गोलंदाजी करताना सुरूवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. (Womens IND vs SL Final)

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकात ९ बाद ६५ धावात रोखत अंतिम सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारताकडून रेणुका सिंहने ३ गडी बाद केले. तर, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी २ गडी बाद केले. रेणुका सिंहने टाकलेले चौथे षटक श्रीलंकेसाठी फार वाईट ठरले. या षटकात श्रीलंकेने तब्बल ३ गडी गमावले. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली, चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी 2 धावाकरून धावबाद झाली. तर पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला भोपळा ही फोडू देता बाद केले.

यानंतर, राजेश्वरी गायकवाडने निलाक्षी डिसेल्वाला ६ धावांवर बाद करत लंकेला सहावा दणका दिला. मलिशा शेहानीला स्नेह राणाने शुन्यावर बाद करत श्रीलंकेची अवस्था ७ बाद २५ धावा अशी केली. दरम्यान, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी केलेल्या गोलंदाजीमुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करू दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेची अवस्था ४३ धावांवर ९ बाद अशी करून ठेवली. श्रीलंकेच्या इनोका आणि अचिनी यांनी श्रीलंकेन संघाला अर्धशतकी धावसंख्या पार करून दिले. या दोन्ही फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज देत लंकेला ६५ धावांपर्यंत पोहचवले. भारताला विजयासाठी ६६ धावाची गरज आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT