Latest

Asia Cup : टीम इंडियाची सलग 8व्यांदा अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये थायलंडचा 74 धावांनी पराभव

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's Asia Cup : भारतीय महिला संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सिलहटमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने थायलंडचा 74 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात थायलंडच्या संघाला 9 गडी गमावून केवळ 74 धावा करता आल्या. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 42 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने गोलंदाजीत तीन बळी घेतले. शेफालीला तिच्या दमदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंडाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पण पाचव्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का 38 धावांवर बसला. स्मृती मानधना 13 धावा करून बाद झाली. यानंतर 10व्या षटकात 67 च्या धावसंख्येवर शफाली तंबूत परतली. कर्णधार हरमनप्रीत कौर (30 चेंडू 36) आणि जेमिमा रॉड्रिग्स (26 चेंडू 27) यांनी संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेले. शेवटी, पूजा वस्त्राकरने 13 चेंडूत 17 धावा फटकावत संघाला 150 च्या जवळ नेले. थायलंडकडून एस टिपोचने सर्वाधिक तीन बळी घेतले.

149 धावांच्या विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाची दमछाक झाली. त्यांचे केवळ दोनच फलंदाज दहा पेक्षा जास्त धावा करू शकले आणि त्यामुळे ते विजयापासून दूर राहिले. भारताकडून दीप्ती शर्माने चार षटकांत अवघ्या 7 धावा देत तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय राजेश्वरी गायकवाडने दोन गडी बाद केले. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

2004 मध्ये सुरू झालेल्या महिला आशिया कप स्पर्धांचे भारताने सलग 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे, परंतु 2018 मध्ये त्यांना अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषक उंचावेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. 2012 पूर्वी, आशिया चषक स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात येत होती. त्यामुळे भारतीय संघ हा एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चार वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे.

सेमीफयनलमध्ये शेफाली-दीप्ती यांची चमकदार कामगिरी

भारताकडून ऑफस्पिनर दीप्ती शर्माने सात धावांत तीन बळी तर मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने सहा धावांत एक बळी घेतला. थायलंडकडून कर्णधार एन चाईवाई आणि नट्टाया बोचथम यांनी सर्वाधिक 21-21 धावा केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावा जोडल्या. राजेश्वरी गायकवाडने दोन तर शेफाली वर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

साखळी सामन्यातही थायलंडचा पराभव केला होता

याआधी, साखळी फेरीत भारताविरुद्ध थायलंडची कामगिरी वाईट झाली होती. ज्यात त्यांना नऊ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करत 15.1 षटकात 37 धावांवर बाद केले आणि त्यानंतर सहज लक्ष्याचा पाठलाग केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT