Latest

Punjab crime News : अत्‍यंत लाजिरवाणे..! मुलाच्‍या प्रेमविवाहाची शिक्षा आईला, महिलेला अर्धनग्‍न करुन….

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील एक अत्‍यंत लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने केलेल्‍या प्रेमविवाहाची शिक्षा त्‍याच्‍या आईला भोगावी लागली आहे. वलटोहा शहरातील तरुणीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाच्या आईला विवस्त्र करून रस्त्यावर पळवण्यात आले. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, हा संतापजनक प्रकार सुरु असताना पीडितेच्‍या मदतीला कोणीच समोर आले नाही. निल्‍लर्जपणे जमाव पीडित महिलेचा व्‍हिडिओ बनवत होता. या प्रकरणाची गंभीर दखल पंजाब महिला आयोगाने घेतली आहे. पोलिसांनी काय कारवाई केली? याचा अहवाल मागवला आहे. ( Punjab crime News )

प्रेमविवाहाचा जाब विचारत महिलेवर अत्‍याचार

पीडितेने वलटोहा पोलिस ठाण्‍यात दिलेल्‍या फिर्यादीनुसार, तिच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमविवाह केला आहे. ३१ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी शरणजीत सिंग उर्फ ​​सनी, गुरचरण सिंग, कुलविंदर कौर उर्फ ​​मणी आणि दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराबाहेर आले. त्‍यांनी पीडित महिलेला मुलाने केलेल्‍या प्रेमविवाहाबाबत जाब विचारला. यानंतर आरोपींनी तिच्या गळ्यात हात घातला. तिला अर्धनग्न करत रस्त्यावर पळायला लावले. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. काही वेळानंतर पीडित महिलेच्‍या पतीला आणि नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाली. त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यानंतर पीडित महिलेची जमावाच्‍या तावडीतून सुटका केली.  तोपर्यंत जमानवातील काहींनी महिलेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला हाेता.

पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप

३१ मार्चच्या रात्रीच तिने पोलिसात जाऊन तक्रार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली, पण कोणतीही कारवाई केली नाही. एवढेच नाही तर पोलिसांनी ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला असा दावाही पीडितेसह तिच्‍या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी भिखीविंडचे पोलीस अधीक्षक इंदर सिंग यांनी सांगितले की, पीडितेने दिलेल्‍या फिर्यादीनुसार शरणजीत सिंग, गुरचरण सिंग कुलविंदर कौर रहिवासी वलटोहा आणि दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

आरोपी व्हिडिओ बनवत राहिले, कोणीही मदतीला आले नाही

महिलेने सांगितले की, आरोपी अर्धनग्न अवस्थेत तिचा पाठलाग करत होते तेव्हा कोणीही तिला मदत केली नाही. इतकंच नाही तर आरोपी व्हिडिओ बनवत राहिला, एका वाटसरूने विरोध केल्यावर आरोपींनी व्हिडिओ बनवणं बंद केलं. एवढे सगळे होऊनही आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्‍यान, या प्रकरणाची गंभीर दखल पंजाब महिला आयोगाने घेतली आहे. या लाजिरवाण्या घटनेबाबत पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल मागवला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT