Latest

भयंकर..! ‘YouTube’ व्‍हिडिओ पाहून घरीच प्रसूती, पत्‍नीचा मृत्‍यू; पतीला अटक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'यूट्यूब' वर ( YouTube) व्‍हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्‍याचा हट्ट पत्‍नीच्‍या जीवावर बेतला. तामिळनाडूतील पोचमपल्‍लीजवळील पुलियामपट्टी येथे ही भयंकर घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
(Delivery at Home )

Delivery at Home : नेमकं काय घडलं ?

पुलियामपट्टी येथील डी. मधेश ( वय ३० ) याचे लोगनयागी ( वय २७ ) हिच्‍याशी विवाह झाला. दोघांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.विवाहानंतर पत्‍नी गर्भवती राहिली. दाम्‍पत्‍याने निसर्गोपचार घेत घरीच उपचार सुरु केले. यानंतर रुग्‍णालयात न जात घरातच प्रसूती करण्‍याचा निर्णय दाम्‍पत्‍याने घेतला. मंगळवार, २२ ऑगस्‍ट रोजी लोगनयागी हिला प्रसूती वेदना सुरु झाल्‍या. त्‍याने यूट्यूब' वर (YouTube) व्‍हिडिओ पाहून घरीच प्रसूती केली. लोगनयागी हिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, नाळ कापताना गुंतागुंत झाली आणि लोगनयागी हिला प्रचंड रक्‍तस्‍त्राव झाला. मधेश याने पत्‍नीला सकाळी पोचमपल्‍ली येथील एका खासगी रुग्‍णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तिच्‍यावर उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे घोषित केले.

पतीला अटक

यूट्यूब व्हिडिओ पाहून मेधशने पत्‍नीची प्रसूती केल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दाम्‍पत्‍य गावातील आरोग्य परिचारिकाच्या देखरेखीखाली होते. लोगनयागी हिने धर्मपुरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला (PHC) अनेकदा तपासणीही केली हेती. मात्र उपचारांचे पालन केले नव्‍हते. निसर्गोपचार घेत असल्‍याचे सांगत दाम्‍पत्‍याने वेळेवर वैद्यकीय मदत घेण्यास नकार देणे पत्‍नीच्‍या जीवावर बेतले. याप्रकरणी पतीविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

SCROLL FOR NEXT