Latest

IPL 2024 CSK : सीएसकेसाठी धोनी मारणार विजेतेपदाचा ‘षटकार’?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 CSK : एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सीएसकेने 2023 ची आयपीएल ट्रॉफी शेवटच्या चेंडूवर जिंकली आणि विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावून मुंबईशी बरोबरी केली. गेल्या वर्षभरापासून चेन्नई संघात अनेक बदल झाले आहेत. या बदलांसह कॅप्टन कुल धोनी जेतेपदाचा षटकार मारण्याचा चमत्कार करू शकेल का, याची उत्सुकता चाहत्यांसह क्रिकेट विश्लेषकांना लागली आहे.

सीएसकेची सर्वात मोठी ताकद कर्णधार एम.एस. धोनी आहे. वर्षभरानंतर त्याला खेळताना पाहण्यात क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. 2023 च्या आयपीएलनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो मैदानात आला नाही. यंदाच्या हंगामासाठी सीएसकेने सराव सुरू केला आहे. 22 मार्चलाच धोनीच्या संघाची लढत विराट कोहलीच्या आरसीबीशी होणार आहे. हा उद्घाटनाचा सामना आहे. 2023 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर ते पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू शकतील का हे पाहणे मनोरंजक असेल.

आयपीएल 2023 मध्ये धोनीची कामगिरी (IPL 2024 CSK)

धोनीने 2023 च्या आयपीएलमध्ये 16 सामने खेळून 104 धावा केल्या. त्याने 182.46 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यादरम्यान त्याची सरासरी 26.0 राहिली. यष्टीरक्षण करताना त्याने 7 झेल घेतले आणि तीन खेळाडूंना यष्टीचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. धोनीची फलंदाजीतील धावांची आकडेवारी निराशाजनक आहे.

ऋतुराजच्या जोडीला कॉनवे ऐवजी रचिन

सीएसकेच्या विजयाचा पाया गेल्या काही वर्षांपासून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी रचला आहे. गायकवाड खेळताना दिसेल; पण त्याचा सलामी साथीदार कॉनवे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशातच आता सलामीवीर म्हणून रचिन रवींद्रला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

गायकवाडवर सीएसकेचा विजय खूप अवलंबून आहे. परंतु त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागेल. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये गायकवाडने आपल्या संघासाठी सर्व सामने खेळून 590 धावा केल्या होत्या. यावेळी आयपीएलपाठोपाठ टी-20 विश्वचषक स्पर्धाही होणार आहे. पहिल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी करून गायकवाडला आपला दावा सांगण्याची चांगली संधी असेल. गायकवाडने आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 51 सामने खेळले असून 1797 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39.1 असून स्ट्राईक रेट 135.5 आहे. या स्पर्धेत त्याच्या नावावर 14 अर्धशतके आणि एक शतक आहे. (IPL 2024 CSK)

सीएसकेने मिशेलसाठी मोजली मोठी रक्कम

रचिन रवींद्र व्यतिरिक्त सीएसकेने यावेळी न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलचाही आपल्या संघात समावेश केला आहे. रचिन रवींद्रला सीएसकेने अवघ्या 1.8 कोटींमध्ये विकत घेतले, तर डॅरिल मिशेलसाठी 14 कोटी रुपये खर्च केले. मिशेल याआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.

मिशेल बेन स्टोक्सची जागा घेणार?

डॅरेल मिशेलने 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी चमकदार कामगिरी केली होती. कदाचित त्यामुळेच धोनीच्या संघाची नजर त्याच्यावर राहिली. यावेळी बेन स्टोक्स सीएसकेकडून खेळत नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी मिशेलचा संघात समावेश करण्यात आल्याचे मानले जात आहे. स्टोक्सची उणीव भरून काढण्यात तो यशस्वी होतो का, हे येणारा स्पर्धेचा काळ ठरवेल. मिशेलने आतापर्यंत 195 टी-20 सामने खेळले असून 4251 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 31.48 तर स्ट्राईक रेट 135.29 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 21 अर्धशतके आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 76 बळीही मिळवले आहेत.

शार्दुल ठाकूरचे पुनरागमन

यावेळी संघाने दीपक चहरच्या साथीला शार्दुल ठाकूरला मोठी रक्कम खर्च करून संघात घेतले आहे. ठाकूरने आतापर्यंत खेळलेल्या 86 आयपीएल सामन्यांमध्ये 89 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 286 धावा आहेत. त्याच्यात गोलंदाजीसोबतच बॅटनेही धावा काढण्याची क्षमता आहे.

समीर रिझवीवर मोठा सट्टा

सीएसकेने यावेळीही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सर्वात ठळक नाव आहे ते समीर रिझवी याचे. आयपीएल लिलावापूर्वी रिझवीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. परंतु सीएसकेची नजर त्याच्यावर खूप दिवसांपासून होती. यामुळेच 8.4 कोटींची मोठी रक्कम मोजून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यामुळे तो कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सीएसकेचा संघ : एम.एस. धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, रविंद्रन शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश टेकशाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT