पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना वारंवार म्हणत होते. आता राज्यात त्यांचे सरकार आहे; मग ते आता आरक्षण का देत नाहीत? त्यांना महाराष्ट्राची स्थिती मणिपूरसारखी करायची आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. सरकारच मराठा व ओबीसींचा वाद लावण्याचे काम करीत असल्याचाही आरोप पटोले यांनी केला. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी आढावा बैठकीनिमित्त पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसारखे वागतात!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नव्हे तर गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. प्रत्येकवेळी महाराष्ट्रात आल्यावर ते महाराष्ट्रातील एक उद्योग गुजरातला घेऊन जातात. मुंबई शहरातील हिरे व्यापार ते गुजरातला घेऊन गेले. मात्र, आता ते व्यापारी परत मुंबईला येण्याचा प्रयत्न करीत आहेत. या लोकांनी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही, असेही पटोले म्हणाले.
निवडून येणार्याला उमेदवारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. त्यानुसार पक्षाचा सर्वे सुरू असून, निवडून येणार्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.