Latest

Covid-19 चा नवीन व्हेरिएंट डिसेंबरमध्येच का येतो?, तज्ज्ञांनी सांगितले कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : २०१९ चा हिवाळा होता आणि संपूर्ण जग जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते. पण, आपल्या सर्वांना माहित आहे की, प्रत्येकाचे आयुष्य एका जीवघेण्या विषाणूने बदलून टाकले. हा विषाणू प्रथम चीनमध्ये आढळून आला आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगावर आक्रमण केले. तो म्हणजे कोरोना. चार वर्षांनंतर कोविड-१९ साथीचा रोग नियंत्रणात आहे असे वाटत असले तरी हा विषाणू त्याच्या अनेक उत्क्रांती स्वरूपांमध्ये अजूनही आपल्यामध्ये आहे. कारण या डिसेंबरमध्ये कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तो म्हणजे JN.1. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 चे "व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट" म्हणून वर्गीकरण केले आहे. पण सार्वजनिक आरोग्यासाठी त्याचा कमी प्रमाणात धोका असल्याचे नमूद केले आहे.

संबंधित बातम्या 

कोविड-१९ चे तीन मोठे म्युटेशन्स

डिसेंबर २०२० मध्ये कोरानाचे आपण अल्फा (B.1.1.7), बीटा (B.1.351), आणि गामा (P.1) असे तीन मोठे म्युटेशन्स आपण पाहिले. एक वर्षानंतर डिसेंबर २०२१ मध्ये लॉकडाउन शिथिल होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनंतर ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे लोकांना घरीच राहावे लागले. २०२२ च्या डिसेंबरमध्ये नवीन मोठे व्हेरिएंट आले नाहीत. पण BA.2 आणि BA.5 सारख्या सब-व्हेरिएंटचा संसर्ग वाढला. हे सर्व कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन शाखेशी संबंधित आहेत आणि आता JN.1 व्हेरिएंट आला आहे, हा देखील Omicron वंशातील आहे.

या विविध घडामोडींमधील एक व्हेरिएंट वैशिष्ट्य म्हणजे डिसेंबरमधील कडाक्याच्या थंडीच्या महिन्यात पहिल्यांदा कोरोना (जसे की ते २०१९ आणि २०२० च्या सुरुवातीस) जगासमोर आला होता. या डिसेंबरमध्ये एक नवीन व्हेरिएंट आला आहे. यामुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट डिसेंबरमध्ये का येतो? आणि हा नवीन व्हेरिएंट नेमका आहे तरी काय? हे जाणून घेऊ.

JN.1 व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोना विषाणूच्या नवीन म्युटेशनला JN.1 असे नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित केले आहे. भारत, चीन, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये तो आधीच आढळून आला आहे. BA.2.86 वंशाचा भाग, जो SARS-CoV-2 च्या Omicron अथवा B.1.1.529 प्रकाराचा वंशज आहे. JN.1 व्हेरिएंट हा स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्युटेशनसह आला आहे.

पीएसआरआय इन्स्टिट्यूट ऑफ पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जी. सी. खिलनानी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "नवीन व्हेरिएंटमुळे ताप, घसा खवखवणे, खोकला आणि डोकेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. तर वृद्ध, लठ्ठ आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग (COPD), मधुमेह, कर्करोग आणि इतर आजाराने त्रस्त लोकांना तो हानिकारक ठरू शकतो."

डिसेंबरमध्येच का येतो कोरानाचा नवा व्हेरिएंट?

कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे थंड आणि कोरडा हिवाळा वातावरण कारणीभूत असल्याचे अनेक अभ्यासांत नमूद केले आहे.
नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, डेल्टा व्हेरिएंटमुळे सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीचे विश्लेषण करण्यात आले. त्यात असे दिसून आले की कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान हवामानामुळे विषाणूचा प्रसार सहज झाला. जसजसे आपण उन्हाळ्यापासून हिवाळ्याकडे जात होतो तसतसे तापमान कमी झाले आणि हवामान कोरडे झाले. ज्यामुळे उत्तर गोलार्धातील देशांमध्ये कोविड-१९ ची तीव्र स्वरुपाची दुसरी लाट आली.

चीनच्या सिचुआन इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनीही अशाच एका गृहीतकाची पुष्टी केली आहे. त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की नियंत्रित (उबदार) परिस्थितीत राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा थंड वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

"कोविड-१९ हा इतर श्वसन विषाणूंप्रमाणे एक हंगामी पॅटर्न प्रदर्शित करतो. त्यात दोन घटक सतत प्रवाही असतात. ते म्हणजे विषाणू आणि आपले शरीर. जसजसे विषाणू विकसित होत जातात, नवीन स्ट्रेन्स उदयास येतात. तर पूर्वीच्या स्ट्रॅन्समुळे आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. "याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात नेहमीच एक 'नवीन गोष्ट' असते ज्याला आपले शरीर ओळखत नाही. ज्यामुळे संभाव्य संक्रमण होऊ शकते," असे कोची येथील अमृता हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपू टीएस यांनी म्हटले आहे.

सुट्टीतील प्रवास

पहिल्यांदा चीनमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोना आढळून आला. तेथून तो जगभर पसरला. डिसेंबरमध्ये उत्तर आणि दक्षिण गोलार्धात सुट्टीचा हंगाम असतो. दक्षिणेत ख्रिसमस असताना उत्तर गोलार्धातील देश विशेषत: चीनमध्ये जानेवारीत चंद्राचे नवीन वर्ष साजरे केले जाते. या सुट्टीच्या हंगामात लोक एक ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी अधिक प्रवास करत असल्याने तसेच गर्दी वाढल्याने विषाणू जगभर फैलावतो. या वर्षीही JN.1 व्हेरिएंट सुट्टीच्या हंगामामुळे जगभर वेगाने पसरत आहे. "सुट्ट्यांचा हंगामात पर्यटनस्थळी गर्दी होते. प्रवासी आणि स्थानिक लोकांमध्ये जवळचा संपर्क येऊन त्याचा प्रसार वेगाने होतो," असेही डॉ. दिपू पुढे म्हणाले.

चिंतेचे कारण आहे का?

यामुळे घाबरण्याची गरज नाही. पण बदलत्या मानवी वर्तनाचा हवाला देत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. "या टप्प्यावर हायपोक्सियाचा म्हणजेच ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा अथवा गंभीर आजारी व्यक्तींना उच्च प्रसार होईल असा कोणताही पुरावा दिसत नाही. पण वृद्ध, लठ्ठ आणि लस न घेतलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. JN.1 व्हेरिएंटमुळे प्रकरणे वाढत आहेत," असे रुबी हॉल क्लिनिकचे कन्सल्टंट, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. देवाशिष देसाई यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT