Latest

Russia-Ukraine War : …म्हणून युक्रेनला शस्त्रपुरवठा केला, जो बायडेन यांची स्पष्टोक्ती

अमृता चौगुले

कीव्ह/मॉस्को, वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) 97 दिवसांनंतरही नाटोचे सैन्य युद्धात थेट उतरलेले नाही. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात नाटो फौजा रशियावर हल्ला करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही लोकशाही, स्वातंत्र्य, सार्वभौम आणि समृद्ध युक्रेन पाहू इच्छितो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बायडेन यांनी लेखात म्हटले आहे की, अखेर या युद्धाचा (Russia-Ukraine War) शेवट मुत्सद्देगिरीतूनच होईल. युक्रेनला लढता यावे यासाठीच शस्त्रे पाठवली. संवादाची वेळ येईल तेव्हा युक्रेनही लाचार न होता मजबूत स्थितीत असावा याच हेतूने आम्ही युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत केली. आम्हाला नाटो (NATO) आणि रशिया यांच्यात युद्ध व्हावे, असे वाटत नाही. जोपर्यंत अमेरिका किंवा आमच्या सहकार्‍यांवर हल्ला होत नाही, तोपर्यंत आम्ही या युद्धात सहभागी होणार नाही.

अमेरिकेकडून युक्रेनला लष्करी मदत

अमेरिका युक्रेनला 60 किलोमीटरहून अधिक पल्ल्याच्या तोफा देणार आहे. तसेच अमेरिका युक्रेनला मध्यम पल्ल्याची हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम देणार आहे. या यंत्रणेची किंमत 70 कोटी डॉलर इतकी आहे. याशिवाय हेलिकॉप्टर जेवलीन अँटी टँक वेपन सिस्टीम, टेक्निकल व्हेईकल देखील युक्रेनला पाठविले जाणार आहे.

अ‍ॅसिड साठ्यावर रशियाचा हल्ला

दरम्यान, रशियाने सेवेरोडोनेटस्कमधील एका रासायनिक प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या प्रकल्पातील नायट्रिक अ‍ॅसिडच्या (nitric acid) टँकवरही हल्ला करण्यात आला आहे. त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा वेडेपणा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

SCROLL FOR NEXT