Latest

घाऊक महागाई दर अकरा महिन्यांच्या निचांकी स्तरावर

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ महागाई निर्देशांक पुन्हा एकदा सात टक्क्यांच्या वर गेलेला असताना घाऊक महागाई निर्देशांकाचे आकडे मात्र दिलासादायक आले आहेत. सरत्या ऑगस्ट महिन्यात हा निर्देशांक १२.४१ टक्के इतका नोंदविला गेला. घाऊक महागाई निर्देशांकाचा (डब्ल्यूपीआय) हा गेल्या ११ महिन्यांचा निचांकी स्तर आहे. याआधी जुलै महिन्यात हा निर्देशांक १३.९३ टक्क्यांवर होता.

गेल्या जून महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक १६.२३ टक्के इतका नोंदविला गेला होता. या निर्देशांकात सुधारणा करण्यात आली असून, अंतिम आकडे १५.८३ टक्क्यांवर आल्याचे व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

सलग सतराव्या महिन्यात निर्देशांक १० टक्क्यांवर

घाऊक महागाई निर्देशांकात घट झाली असली तरी अजुनही हा निर्देशांक दहा टक्क्यांच्या वरच आहे. विशेष म्हणजे सलग सतराव्या महिन्यात हा निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर आहे. मागील ऑगस्टमध्ये मिनरल ऑईल, खाद्यान्न श्रेणीतील वस्तू, क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बेसिक मेटल्स, रसायने आणि रासायनिक पदार्थ, वीज आदींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक १०.७७ टक्क्यांच्या तुलनेत वाढून १२.३७ टक्के इतका झाला आहे.

वार्षिक तत्वावर भाजीपाल्याचे दर २२.२९ टक्क्याने वाढले आहेत. यात बटाट्याचे दर ४३.५६ टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे कांद्याच्या दरात २४.७६ टक्क्याने घट झाली आहे. फळांचे दर ३१.७५ टक्क्यांनी वाढले असून दुधाचे दर ४.७८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. अंडी, मटण, मासे यांचे दर ७.८८ टक्क्यांनी वाढले आहेत. तर डाळींच्या दरात ११.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक ८.१६ टक्क्यांच्या तुलनेत ७.५१ टक्के इतका नोंदविला गेला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT