पुढारी ऑनलाईन डेस्क : Who is Rachin Ravindra : रचिन रवींद्रने इंग्लंडविरुद्ध (England Vs New Zealand) शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावण्यात यश मिळवले. रचिनने अवघ्या 82 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. तो न्यूझीलंडसाठी वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. हा सामना न्यूझीलंडने 9 विकेट्स आणि 82 चेंडू राखून जिंकला. न्यूझीलंडसाठी कॉनवेने 152 धावांची तर रचिन रवींद्रने 123 धावांची नाबाद खेळी साकारली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 273 धावांची भागीदारी रचली.
कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी केलेली 273 धावांची भागीदारी ही एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. कॉनवेने आपल्या खेळीत 121 चेंडूंचा सामना केला ज्यात त्याने 19 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी रवींद्रने 96 चेंडूंचा सामना केला आणि त्याने आपल्या डावात 11 चौकार आणि 5 षटकार मारले.
रचिन रवींद्र मूळचा भारतीय आहे, त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर आर्किटेक्ट होते. कृष्णमूर्ती बंगळुरूमध्ये क्लब क्रिकेटही खेळले. मग त्याने न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच स्थायिक झाला. रवींद्रचे आजोबा बंगळूरच्या विजया कॉलेजमध्ये शिकवायचे. रचिनचा जन्म विल्मिंग्टनमध्ये झाला आणि तिथेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने न्यूझीलंडच्या अंडर-19 संघात स्थान मिळवले आणि यशाची शिडी चढत असतानाच त्याची निवड कसोटी संघात झाली. त्याने भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यांचे वडील सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांनी या दोघांची नावे एकत्र केली. त्यांनी राहुलमधील 'रा' आणि सचिनमधील 'चिन' एकत्र करून नाव रचिन हे नाव तयार केले.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा रचिन रवींद्र फलंदाज ठरला आहे. रचिनने केवळ 82 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकात पहिला सामना खेळताना शतक झळकावणारा रचिन रवींद्र जगातील तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली – 22 वर्षे 106 दिवस
अँडी फ्लॉवर्स – 23 वर्षे 301 दिवस
रचिन रवींद्र – 23 वर्षे 321 दिवस