Latest

श्रीधर पाटणकरांना ३० कोटी देणारा नंदकिशोर चतुर्वेदी निघाला ‘हवाला सम्राट’!

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.चे मालक श्रीधर पाटणकर यांना विनातारण 30 कोटी रुपयांचे कर्ज देणारा नंदकिशोर चतुर्वेदी पकडला गेला, तर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकारणी, उद्योजक आणि कंपन्यांचा काळा पैसा समोर येईल. पाटणकरांना दिलेल्या या कथित कर्जामुळे चर्चेत आलेले चतुर्वेदी ही साधी आसामी नाही. भारतातील हा सर्वात मोठा हवाला ऑपरेटर आज कुठे आहे? भारतात आतापर्यंत तो हाती लागलेला नाही. असे म्हणतात की, तो कुठल्या तरी आफ्रिकन देशात दडून बसलेला आहे.

'ईडी'च्या अधिकार्‍यांनी नामोल्‍लेख न करण्याच्या अटीवर दिलेला चतुर्वेदीचा तपशील मोठा धक्‍कादायक आहे. देशातील जे बडे हवाला ऑपरेटर्स आहेत त्यातील एक मोठे नाव म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी. उत्तर प्रदेशातील मथुरा या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतून आलेला नंदकिशोर व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) आहे. लहान-लहान उद्योजकांसाठी वार्षिक आर्थिक नियोजन करून देणे, अशी सुरुवात त्याने केली आणि नंतर बनावट बिले तयार करून काळा पैसा व्याजबट्ट्याच्या धंद्यात गुंतवण्यासाठी तो मदत करू लागला. छोट्या हवाला ऑपरेटरच्या संपर्कात येता-येता

चतुर्वेदी देशातील एक सर्वात मोठा हवाला ऑपरेटर बनला. उद्योजक, व्यापार्‍यांना खोटी बिले तयार करून करसवलती मिळवण्याचे आणि त्यातून येणारा पैसा गुंतवण्याचे मार्ग त्याने निर्माण केले. त्यासाठी कुठेही अस्तित्वात नसलेल्या खोट्या कंपन्या कागदोपत्री निर्माण केल्या. त्यांना 'शेल' कंपन्या म्हणतात. अशा तब्बल 150 शेल कंपन्यांचे प्रचंड मोठे देशव्यापी जाळे या चतुर्वेदीने निर्माण केले. या बोगस कंपन्यांचे मुख्यालय कोलकात्यात थाटले. तेही प्रत्यक्षात नव्हे. कागदोपत्रीच! 2000 च्या मध्यात चतुर्वेदीचा संपर्क राजकारण्यांशी येऊ लागला आणि काळा पैसा त्याच्याकडे चालत येऊ लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये देशात नोटबंदी झाली. याच नोटबंदीत काळा पैसा जमवून प्रचंड चांदी करून घेणार्‍या पुष्पक बुलियन कंपनीचे प्रकरण ईडीसमोर आले आणि नंदकिशोर चतुर्वेदी पहिल्यांदा ईडीच्या रडारवर आला. 2017 पासून ईडी या चतुर्वेदीचा शोध घेतेच आहे. याच वर्षात चतुर्वेदीने आपल्या हमसफर नावाच्या शेल कंपनीमार्फत श्रीधर पाटणकरांच्या खात्यात 30 कोटी रुपये जमा केले, असे सांगितले जाते.

नोटबंदीच्या काळात चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांच्या पुष्पक कंपनीने बंद झालेल्या नोटांमध्ये तब्बल 84.5 कोटी रुपये स्वीकारले. या रकमांच्या बदल्यात पुष्पक बुलियनमधून 258 किलो सोने विकले. जुन्या चलनातील रक्‍कम नव्या चलनात आणल्यानंतर पुष्पकने ती विविध शेल कंपन्यांच्यामार्फत ठिकठिकाणी गुंतवली. त्यातील एक ठिकाण म्हणजे श्रीधर पाटणकर यांची श्री साईबाबा गृहनिर्मिती. पाटणकरांना चतुर्वेदीने दिलेले 30 कोटी रुपये हे पुष्पक ग्रुपचेच होते.

पाटणकरांच्या खात्यात चतुर्वेदीने ते हमसफर कंपनीमार्फत जमा केल्यानंतर ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमध्ये पुष्पक ग्रुपने याच रकमेच्या बदल्यात 11 फ्लॅट घेतले. इथपर्यंत ईडीने पुष्पक ग्रुपच्या काळ्या पैशाचा माग काढला आणि याच मागावर ईडीला पुन्हा नंदकिशोर चतुर्वेदी सापडला.

असे म्हणतात, उत्तर भारतातील दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या लोकांना चतुर्वेदीने काळा पैसा पांढरा करण्यात मोठी मदत केली आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याचा आणि एका राजकीय कुटुंबाचाही प्रचंड पैसा चतुर्वेदीने विविध मार्गांनी गुंतवला. अशा अनेक आर्थिक घोटाळ्यांमध्ये वाँटेड असलेल्या चतुर्वेदीसाठी ईडीने वारंवार लूकआऊट नोटीस काढली. मात्र, आजवर तो हाती लागलेला नाही.

150 बनावट कंपन्यांचा सूत्रधार

नंदकिशोर चतुर्वेदी याने देशभरात 150 बनावट म्हणजेच शेल कंपन्यांचे जाळे पसरवले. त्याच्या या जाळ्यात भल्या-भल्या राजकीय नेत्यांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेतला. त्यात उत्तर भारतातील दोन माजी मुख्यमंत्री, त्यांचे राजकीय समर्थक आहेत. महाराष्ट्रातील एक बडा नेता आणि एका राजकीय कुटुंबाला चतुर्वेदीने काळा पैसा गुंतवण्यात मदत केली.

तसे धागेदोरे ईडीच्या हाती कधीच लागले आहेत. गेली 20 वर्षे चतुर्वेदीचा हा गोरखधंदा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या खात्यावर 30 कोटी रुपये विनातारण कर्ज म्हणून जमा करणारा चतुर्वेदीच निघाला. यानिमित्ताने पाटणकरांचे नाव चतुर्वेदीशी जोडले गेल्याचे समोर आले. मात्र, आजवर समोर आला नाही तो हवाला सम्राट चतुर्वेदी! तो कुठे आहे? कुणालाही माहिती नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT