Latest

Congress Lok Sabha 2024: स्मृती इराणी यांना अमेठीतून आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार के. एल. शर्मा कोण आहेत?

मोनिका क्षीरसागर
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अमेठी आणि रायबरेलीचा तिढा काँग्रेसने अखेर शेवटच्या क्षणी सोडवला. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून लढणार आहेत. तर दीर्घकाळ सोनिया गांधींचे प्रतिनिधी राहिलेले किशोरी लाल शर्मा अमेठीतून लढणार आहेत. त्यामुळे आता रायबरेलीची लढत राहुल गांधी विरुद्ध भाजपचे दिनेश प्रताप सिंह तर अमेठीची लढत भाजपच्या स्मृती इराणी विरुद्ध कॉंग्रेसचे के. एल. शर्मा अशी होणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधींसह रायबरेलीकडे रवाना झाले. (Congress Lok Sabha 2024)
गेले काही दिवस काँग्रेसमध्ये अमेठी आणि रायबरेलीवरून बरीच मोठी चर्चा सुरू होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी या दोघांचीच नावे सुरुवातीला अग्रक्रमाने चर्चेत होती. मात्र प्रियंका गांधी लोकसभेच्या रिंगणात नसणार हे स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले होते. राहुल गांधी यांनी मात्र वेळोवेळी पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, असे संकेत दिले होते. त्यामुळे अमेठी किंवा रायबरेली या दोनपैकी एका ठिकाणी राहुल गांधी उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट होते.  परंतु दुसऱ्या उमेदवाराबद्दल साशंकता होती. दीर्घकाळ या सगळ्या प्रकरणावर अस्पष्टता राहिल्यानंतर काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी दिली तर सोनिया गांधींचे दीर्घकाळ प्रतिनिधी राहिलेले किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली. (Congress Lok Sabha 2024)

अमेठीतून  उमेदवारी मिळालेले के. एल. शर्मा कोण आहेत?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींऐवजी के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिली. भाजपच्या स्मृती इराणींना ते अमेठीतून  आव्हान देतील. के. एल. शर्मा यांचे पूर्ण नाव किशोरी लाल शर्मा आहे. सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार असताना अगदी सुरूवातीपासून शर्मा त्यांचे प्रतिनिधी होते. सोनिया गांधी १९९९ ला पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या, तेव्हापासून शर्मा त्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यापूर्वी त्यांनी राजीव गांधींसोबतही काम केले आहे. १९८३ मध्ये राजीव गांधींसोबत पहिल्यांदा ते अमेठीला गेले होते. ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. किशोरीलाल शर्मा सोनिया गांधींचे प्रतिनिधी असले तरी ते दीर्घकाळापासून रायबरेलीसह अमेठीमध्येही काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहेत. के. एल. शर्मा हे मूळचे पंजाबमधील आहेत. मात्र उत्तर प्रदेश राज्याचा आणि विशेषतः अमेठी, रायबरेलीबाबत त्यांना चांगला अभ्यास आहे. शिवाय एवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे. गुरुवारी उमेदवार जाहीर करण्याबाबत ते म्हणाले होते की, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच घोषणा केली जाईल. मात्र, ही तयारी गांधी परिवारासाठी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. (Congress Lok Sabha 2024)
 
कार्यालय कालच सजले
टिळक भवन रायबरेली गांधी परिवाराच्या स्वागतासाठी कालपासून सजले आहे. गांधी कुटुंबातील सदस्य या कार्यालयाला भेट देऊन अर्ज भरण्यासाठी जाणार हेही ठरले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवार ठरले नव्हते. अखेर शुक्रवारी सकाळी उमेदवार ठरले. रायबरेलीसाठी अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते सर्वप्रथम रायबरेलीतील टिळक भवनमध्ये येतात. त्यानंतर अर्ज दाखल करतात, असा प्रघात काँग्रेसमध्ये आहे.
कसे आहे रायबरेलीचे समीकरण
रायबरेली लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या पाहिली तर, येथे सर्वाधिक मतदार पासी समाजाचे आहेत. ज्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यांचा कल बहुतांशी काँग्रेसकडे आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत या समाजाच्या मतांचे विभाजन करण्यात भाजपला यश आले. या लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण मतदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याची संख्या साडेतीन ते चार लाख आहे. तर मुस्लिम मतदार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यांची संख्या जवळपास अडीच लाख आहे. यादवांची संख्याही जवळपास तेवढीच आहे. तर राजपूतांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. याशिवाय इतरही जाती आहेत. या लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण आणि राजपूत मतदार परस्पर विरोधी आहे. अशा स्थितीत भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात ब्राह्मणांची एकजूट काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते. यादव यांची संख्या पाहून बसपने ठाकूर प्रसाद यांना येथे उमेदवारी दिली आहे. ठाकूर प्रसाद यादव समाजातील आहेत.  रायबरेलीच्या जागेवर सपा नेहमीच काँग्रेसला पाठिंबा देत आहे. सपाने कधीही काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. अशा स्थितीत यादवांचा कल काँग्रेसकडेच राहिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT