Latest

गुंतवणुकीचा निर्णय घेताना…

Arun Patil

अनिल पाटील , (प्रवर्तक, एसपी वेल्थ, कोल्हापूर )

2022 मध्ये चालू झालेल्या रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धाला आता एक वर्ष झाले आहे. या युद्धाचा फार मोठा परिणाम विविध देशांतील आर्थिक क्षेत्रावर झालेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम अनेक देशांतील सेंट्रल बँकेने व्याजदर वाढविण्यावर झाला आहे. अमेरिकेत मागील चाळीस वर्षांत जितकी महागाई वाढली नाही, तितकी महागाई मागील वर्षी वाढली आहे. त्यामुळे तिथल्या फेडरल बँकेला व्याजदर वाढवावे लागले. अनेक देशांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झालेले आहे; मात्र या मंदीचा परिणाम आपल्या देशावर होणार नाही, असे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे.

आजच्या परिस्थितीत सर्व देशांच्या तुलनेमध्ये भारत हा मात्र वेगळ्या स्वरूपात प्रगती दर्शवित आहे. मंदीचा परिणाम आपल्या देशावर होणार नाही, याचे कारण आपल्या देशातील प्रचंड मोठी असलेली लोकसंख्या आहे. ही जनता कमी अधिक प्रमाणात सतत गुंतवणूक करतच असते.

Dow Jones मार्केट मागील वर्षांमध्ये 36 हजार 859 हा इंडेक्स होता, तो आज 34 हजार 302 वर आहे. वर्षापेक्षा 5 टक्के तो खाली आहे. Nasdaq हा 15200 वरून इंडेक्स आज 11079 वर आहे. तो मागील वर्षापेक्षा 25 टक्केखाली आहे. FTSC इंडेक्स 7586 वरून आज तो 7864 वर दिसत आहे. 3 टक्के परतावा दिलेला आहे. HONGSENG इंडेक्स हा मागील वर्षी 24900 वर होता तो आज 21738 वर आहे. मागील वर्षापेक्षा तो 11 टक्क्यांनी खाली दिसत आहे . TAIWANEWIGHTED इंडेक्स मागील वर्षी 18619 वरून आज 14824 वर दिसत आहे. मागील वर्षापेक्षा 19 टक्क्यांनी तो खाली आहे. SHANGHAI इंडेक्स 3608 वरून आज तो 3195 वर दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो 10 टक्के खाली आहे.

सर्व देशांच्या तुलनेत आपल्या देशातील भांडवली बाजारांचे इंडेक्स फार पडलेले दिसत नाहीत. NIFTY मागील वर्षी 18354 होता. तोच आज 17956 वर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निफ्टी 00.50 टक्के फारच कमी प्रमाणात पडलेला दिसतो. सेन्सेक्स मागील वर्षी 61289 होता. तो आता 60261 आहे. मिडकॅप मागील वर्षी 32340 होता. तो आज 31328 इतका आहे. NIFTY SMALLCAP मागील वर्षी 11938 वरून तो आता 9675 इतका आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो 14 टक्क्यांनी खाली आहे. BANK NIFTY 38300 होता तो आज 42371 वर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्के परतावा दिला आहे. आपल्या देशातील बाजार पडत आहे याचे कारण आहे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत. मागील वर्षी 3 लाख कोटी गुंतवणूक काढली गेली आणि 2023 च्या पहिल्या पंधरवड्यात 8500 हजार कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे, ही बाब फार महत्त्वाची आहे.

आज आपल्या देशातील विविध सेक्टरचा आढावा घेतल्यास सध्या आयटी सेक्टरमध्ये मंदीचे वातावरण दिसते. मागील वर्षात उणे -26 टक्केपरतावा दिला आहे. आयटी सेक्टरमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स 40 टक्के ते 50 टक्क्यांनी खाली आहेत. फार्मा सेक्टरने उणे 9 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. मीडिया सेक्टरने मागील वर्षाच्या तुलनेत उणे 14 टक्के परतावा दिलेला आहे.

2023 मध्ये गुंतवणूक करताना त्या सेक्टरचा अथवा कंपनीचा पीई रेशो पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे. पीई रेशो म्हणजे प्राईस टू इंडेक्स रेशो होय. म्हणजेच किमतीशी मिळकतीचे प्रमाण किती आहे, हे लक्षात येते. साध्या भाषेत समजायचे असेल, तर मला एक रुपये नफा मिळण्यासाठी किती रक्कम गुंतवणूक करावी लागते हे समजते. पीई रेशो कमी असेल तितका गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे असे समजले जाते. कोणत्याही सेक्टरचा किंवा कंपनीचा पीई रेशो जितका जास्त असेल, तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी महाग आहे, असे समजावे. पीई महाग असेल अन् गुंतवणूक केली, तर भविष्यात तितका परतावा मिळणार नाही जितका कमी पीई रेशो असलेल्या ठिकाणी परतावा मिळेल.

भविष्यामध्ये फार चांगला परतावा मिळू शकतो. समजा कुठल्याही सेक्टरचा पीई हा 20 च्या खाली असेल, तर येणार्‍या चार ते पाच वर्षांमध्ये किमान 12 टक्के होऊन अधिक परतावा मिळू शकतो. म्हणून या वर्षी गुंतवणूक करीत असताना कमी पीई रेशो असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करावी. सेन्सेक्स चा पीई रेषो 24 आहे. मिडकॅप 28 आहे. फार्मा सेक्टरचा 32 आहे. आयटी सेक्टरचा 26 आहे. BSE SMALLCAP चा पीई 19 इतका आहे. बँक निफ्टीचा पीई रेशो 17.82 इतका आहे. म्हणजे या वर्षामध्ये गुंतवणुकीसाठी बँक निफ्टी आणि स्मॉल कॅप, आयटी सेक्टर, फार्मा सेक्टरमध्ये संधी आहेत, असे पीई रेशोवरून दिसते. या ठिकाणी गुंतवणूक केल्यास येणार्‍या चार-पाच वर्षांमध्ये किमान 12 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल, अशी आशा वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT