कीव्ह/नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) 12 व्या दिवशी युक्रेनमधील सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथील भारतीय विद्यार्थ्यांची चलबिचलता वाढली आहे. डोळ्यासमोर इजिप्त, नायजेरियाच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी आलेले पाहून आता भारत सरकार आम्हाला वाचविण्यासाठी कधी येणार असा आक्रोष या भारतीय विद्यार्थ्यांनी केला आहे. हे विद्यार्थी, आमचे सरकार मागे का? असे म्हणताना दिसतात.
बिहारच्या भरतपूर येथील शशांक, मोहम्मद महताब रझा, पुदुच्चेरी येथील शेषाधी गोविंद या भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडीओ कॉलवरून त्यांच्या परिस्थितीची माहिती दिली. युद्ध परिस्थितीमुळे भारतीय विद्यार्थी मानसिकद़ृष्ट्याच नाही तर शारीरिकद़ृष्ट्याही कमकुवत झाले आहेत. रात्री बंकरमधून बाहेर पडून ते हॉस्टेलच्या रूम्समध्ये बसले असतानाच, एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे अक्षरशः रात्री दिवस झाल्यासारखे वाटले. हॉस्टेलची संपूर्ण इमारत थरथरली. त्यानंतर सगळे पुन्हा जीव मुठीत घेऊन बंकरमध्ये पळाले. रडून रडून डोळेही सुकले आहेत. आमचा आता येथून बचाव होईल, अशी आशाच नाही, असे काही विद्यार्थी म्हणताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सुमीतून तिरंगा ध्वज घेऊन पायी चाललेल्या विद्यार्थ्यांना देखील जाण्यास मनाई करण्यात आली. भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. पण, पुढे काहीही होत नाही. केवळ बोलणे होते. 12 दिवसांपासून आम्ही येथे अडकून आहोत. आजूबाजूला स्फोट, गोळीबार होत आहे. आमची झोप उडाली आहे. जेवण राहू दे, पिण्याचे पाणी नाही आणि आता वीजही नाही.
12 दिवसांपासून चर्चाच (Russia-Ukraine War)
विद्यार्थी म्हणाले, हॉस्टेलमध्ये इजिप्त, नायजेरियाचीही मुले आहेत. त्यांच्या सरकारने या मुलांची आजच येथून सुटका केली. आम्हाला आमच्या दूतावासाकडून काहीही निरोप नाही. दूतावासाशी खूपदा निष्फळ चर्चा झाली. आम्हाला येथून बाहेर काढण्यासाठी काहीही पावले उचलली गेलेली नाहीत. 12 दिवसांपासून केवळ चर्चाच होत आहे. आम्ही मरणार आहोत, असेच दररोज आम्हाला वाटत आहे. काहीही करा, पण आम्हाला येथून बाहेर काढा.
बर्फ वितळवून पाण्याची सोय
विद्यार्थी म्हणाले, येथे पाणी संपले आहे. आम्ही बर्फ वितळवून पाण्याची व्यवस्था करत आहोत. हल्ल्याची सूचना देणारे सायरनचे आवाज नेहमी येत असतात आणि सायरन वाजला की आम्ही बंकरमध्ये जाऊन लपतो. सायरननंतर बॉम्बफेक होते. दिवसातून अनेकवेळा असे होते. एका ताटात तिघे-तिघे जेवत आहोत. तेही कच्चे जेवण. एअरस्ट्राईकवेळी इमारतीवरून विमान जाते तेव्हा आम्ही जीव मुठीत घेऊन बसतो. घरच्या लोकांनी काळजी करू नये म्हणून ही परिस्थिती त्यांना सांगितलेली नाही, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.