Latest

रेल्वे प्रवाशांचा त्रास संपणार कधी?

backup backup

अलीकडच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारा उशीर, कामकाजातील अनियमितता आणि वारंवार होणारे अपघात यामुळे भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा पुरवण्याच्या दाव्याच्या तुलनेत कुठे आहे, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. सध्याच्या स्थितीत देशाची राजधानी दिल्लीतून निघणार्‍या रेल्वे गाड्या वेळेवर सोडू शकत नाहीयेत. निर्धारित वेळेमध्ये थोडाथोडका नव्हे, तर अनेक तासांचा विलंब होत आहे.

रेल्वे प्रवाशांना जेवणात अडचणी येत आहेत. गाड्यांमधील स्वच्छतेचा मुद्दा कळीचा बनला आहे. नैसर्गिक कारण म्हणून अशा तक्रारींचे समर्थन करता येणार नाही. लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना भेडसावणार्‍या समस्यांची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच आहे. विशेष म्हणजे फॉग सेफ यंत्रे बसवूनही गाड्या उशिराने का धावताहेत, याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. प्रतिकूल हवामानामुळे निर्माण होणारी अडचण हा रेल्वे प्रवासातील एक पैलू नक्कीच आहे; पण व्यवस्थापन अधिक सजग व व्यवस्थित असेल तर समस्या आणि गैरसोय कमी होऊ शकते. याबाबत रेल्वेमधील बहुस्तरीय कमतरता स्पष्टपणे दिसून येतात. धुक्याच्या काळातही गाड्यांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी अँटी-फॉग डिव्हाईसचा वापर करावा, असे गेल्या काही वर्षांत बोलले जात होते; परंतु ही उपकरणे खरोखरच उपयुक्त नाहीत का किंवा त्यांची स्थापना आणि रेल्वेमध्ये योग्य वापर याबाबत व्यवस्थापन स्तरावर काही कमतरता आहे का, याबाबत पुनरावलोकन करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासन हे न करता हातावर हात ठेवून बसणार असेल तर प्रवाशांचा संताप होणे स्वाभाविक आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्याही पंधरा-सोळा किंवा त्याहूनही अधिक तास उशिराने पोहोचत आहेत. दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे, असे सांगितले जात आहे; पण याशिवाय सर्वच स्तरावर अनागोंदी माजली असून, त्याला जबाबदार कोण?

जेव्हा समस्या अधिक गडद होऊ लागतात आणि त्यासंबंधीचे प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागतात, तेव्हा सरकार किंवा रेल्वे खाते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते सोडवण्यासाठी इतर उपाययोजना करण्याविषयी बोलतात; पण काही काळाने पुन्हा येणार्‍या अशा तक्रारींवरून या आश्वासनांची सरकारी बाबूंकडून कशी वासलात लावली गेली, याचे पितळ उघडे पडते. गेल्या काही वर्षांत रेल्वेचे ट्रॅक आणि डब्यांच्या दर्जात सुधारणा झाली आहे. रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बाबतीतही समाधानकारक स्थिती आहे. आधुनिकीकरणाचा दावाही सातत्याने केला जात आहे. गाड्यांना अपघातांपासून वाचवण्यासाठी 'आर्मर सिस्टीम'ची यशस्वी चाचणी झाल्याचीही बातमी आहे. हायस्पीड आणि आधुनिक तंत्रज्ञानासह इतर सुविधांनी सुसज्ज गाड्या सुरू होणे ही लोकांमध्ये आशा जागवण्याच्या द़ृष्टीने चांगली गोष्ट आहे; परंतु अलीकडच्या काळात रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत आणि अनेक मोठे अपघातही समोर आले आहेत. यावरून हेच दिसून येते की, साधनसंपत्तीच्या पातळीवरील कमतरता दूर करण्याचा दावा करूनच सेवेचा दर्जा सुधारणे शक्य असूनही त्याबाबत निर्दोष काम होत नाही. जोपर्यंत व्यवस्थापनाच्या पातळीवर निष्काळजीपणा राहील, तोपर्यंत प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्याची चर्चा निरर्थकच राहणार आहे.

सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास हा पूर्वीपासून स्वस्त वाहतुकीचा पर्याय होता; पण आता तशीही स्थिती राहिलेली नाही. सद्यःस्थितीत रेल्वेचा प्रवासही महाग होत चालला आहे आणि सर्वसामान्यांसाठी जागाही मर्यादित होत चालली आहे. दुसरीकडे, सणासुदीच्या निमित्ताने आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर मोठ्या संख्येने जमणार्‍या लोकांना मिळणार्‍या रेल्वे सुविधांची स्थितीही उत्तम नसल्याचे दिसून आले आहे. मग रेल्वे प्रशासन नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने आणि रेल्वे खात्याने याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT