Latest

HBD Naseeruddin Shah : जेव्हा नसिरुद्दीन शाह यांनी साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं, एखाद्या कलाकारालाही तितकचं आव्हानात्मक आहे. आजवर अनेक कलाकारांनी शिवरायांची भूमिका पडद्यावर साकारलीय. त्यातील खास भूमिका म्हणजे दिग्गज, ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह. तुम्हाला माहितीये का, एका मालिकेसाठी नसिरुद्दीन शाह (HBD Naseeruddin Shah) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली ही ऐतिहासिक भूमिका अजरामर ठरली. (HBD Naseeruddin Shah)

लोकप्रिय भारत एक खोजमध्ये भूमिका 

दूरदर्शनवर 'भारत एक खोज' (Bharat Ek Khoj) नावाची मालिका १९८९ साली प्रदर्शित झाली होती. अखंड भारताचा इतिहास, भारतीय संस्कृती, सामाजिक, भौगोलिक इतिहास या मालिकेत दर्शवण्यात आला होता. ही मालिका अनेक वर्षे दूरदर्शनवर दाखवण्यात येत होती. ती आजही तितकीच लोकप्रिय आहे.

भारत एक खोज ही ऐतिहासिक मालिका जवाहरलाल नेहरू यांचे पुस्तक द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) वर आधारित होती. एकूण ५३ एपिसोड या मालिकेत होते. भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास यातून दर्शवण्यात आला होता. या मालिकेचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती श्याम बेनेगल यांनी केले होते. या मालिकेच्या ३७ आणि ३८ एपिसोडमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला होता. याच एपिसोडमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह होते.

नसिरुद्दीन शाह यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर ठरली. आजही त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत असताना दिसते. नसिरुद्दीन यांच्या भूमिकेतील करारीपणा, रुबाबदारपणा, बोलण्याची, चालण्याची लकब, परफेक्ट संवादफेक, भेदक नजर वाखाणण्याजोगे होते. या मालिकेत औरंगजेबाच्या भूमिकेत ओम पुरी होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कसा केला हेदेखील दाखवण्यात आले.

"शिवाजी" भाग १ मध्ये नसीरुद्दीन शाह, ओम पुरी , अनंग देसाई, अच्युत पोतदार, अहमद खान यांच्या भूमिका होत्या.

SCROLL FOR NEXT