लंडन ः सध्या 'ब्लू झोन डाएट' (Blue Zone Diet) लोकप्रिय होत आहे. 'शतायुषी लोकांचा आहार' अशी त्याची प्रसिद्धी आहे. 'ब्लू झोन' ही काही शास्त्रीय संकल्पना नाही, पण 100 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगणारे लोक राहत असलेल्या भागाचे वर्णन करण्यासाठी याचा वापर केला जातो. एका अभ्यासावरून लक्षात येते की, या भागातील 100 चे वय गाठणार्यांचे प्रमाण अमेरिकेच्या दहा पट अधिक आहे. अमेरिकेतील लेखक आणि नॅशनल जियोग्राफिक पत्रकार डॅन ब्यूएटनर यांनी याला लोकप्रिय केले. त्यांनी पाच ब्लू झोनची माहिती दिली. त्यात इकारिया- ग्रीस, लोमा लिंडा- कॅलिफोर्निया, निकोया द्विपकल्प- कोस्टारिका, ओकिनावा- जपान आणि सार्डिनिया- इटली यांचा समावेश आहे.
या पाच भागांतील लोकांमध्ये मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर अशा आजारांचा प्रसार फार कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. ब्युएटनर यांना त्यांच्यात काही साम्यं आढळली आणि त्यातच या भागांतील लोक निरोगी आणि दीर्घकाळ जीवन का जगतात याचं रहस्य लपलेलं आहे. यातील प्रमुख साम्य म्हणजे आहार. (Blue Zone Diet)
ब्लू झोन डाएट प्रामुख्याने रोपांवर आधारित आहे. पण सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक परंपरांबरोबरच विविध क्षेत्रांतील अन्नाची उपलब्धता आणि उत्पादन यामुळे या पाच भागांत विशिष्ट आहार एकमेकांपेक्षा काहीसे भिन्न असतात. ब्लू झोनमध्ये लोक भोपळा, मटार, कोबी, कांद्याची पात आणि पपई अशी आरोग्यदायी फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खातात. यातून शरीरासाठी आवश्यक असणारी व्हिटॅमिन, खनिजे, फायबर आणि फायटोकेमिकल्स मिळत असतात आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आरोग्यदायी रोपांपासून तयार केलेलं प्रोटीन हे ब्लू झोन डाएटचा मुख्य भाग आहे. (Blue Zone Diet)
ब्लू झोनमधील बहुतांश रहिवासी मोठ्या प्रमाणात अख्ख्या धान्याचे (होल ग्रेन) सेवन करतात. त्यात साधारणपणे फॅटचे प्रमाण कमी असते पण फायबर अधिक असते. या पाच भागांमधील रहिवासी आहारामध्ये मांस, क्रीम, लोणी आणि पनीर अशा सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांऐवजी ऑलिव्ह ऑइल, अवाकाडो आणि फॅटयुक्त मासे अशा अनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करतात. त्याशिवाय बहुतांश ब्लू झोन आहारात रोज मूठभर बदाम, अक्रोड आणि पिस्ते यांचा समावेश असतो. आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स (जीवंत बॅक्टेरिया आणि यीस्ट) असू शकते. त्यामुळे आरोग्याबरोबरच आतड्यांची समस्या असलेल्यांना मदत होत असते. बहुतांश ब्लू झोन आहारात आंबवलेले पदार्थ असतात. ब्लू झोनमधील रहिवाशांच्या आहारामध्ये माशांचे प्रमाण उपलब्धतेसारख्या काही कारणांमुळं वेगवेगळं असतं, पण ते आठवड्यातून किमान तीन वेळा काही मासे खातातच. विशेषतः फॅटयुक्त माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. ते मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.