Latest

नवीन संसद इमारतीच्‍या उद्‍घाटनापूर्वी ‘सेंगोल’ चर्चेत, जाणून घ्‍या याचे ऐतिहासिक महत्त्‍व

नंदू लटके

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते २८ मे रोजी संसदेच्‍या नवीन इमारतीचे उद्‍घाटन होणार आहे. प्रमुख विरोधी पक्षांनी या उद्‍घाटन समारंभावर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्णय घेतला आहे. यावर चर्चा सुरु असतानाच आता 'सेंगोल' चर्चेत आणून मोदी सरकारने काँगेसची कोंडी करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. १५ ऑगस्‍ट १९४७ च्या मध्यरात्री पंडित नेहरूंना ते सुपूर्द करण्यात आले होते. आता नवीन संसदे इमारतीच्‍या उद्‍घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सेंगोल' ( Sengol ) दिला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. 'सेंगोल' म्हणजे काय आणि त्‍याचे इतिहासात महत्त्व जाणून घेऊया…

सेंगोल म्हणजे काय?

सेंगोल हा शब्‍द तामिळ शब्‍द सेम्‍माई वरुन आला आहे. याचा अर्थ आहे 'धार्मिकता' आहे. सेंगोल हा राजदंड आहे. चांदीच्या सेंगोलवर सोन्याचा थर असतो. त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. सेंगोल पाच फूट उंच आहे. १९४७ मध्‍ये दिला गेलेला हा सेंगोल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाजवळ बसवला जाणार आहे. तो विशेष प्रसंगी काढला जाईल, जेणेकरून जनतेलाही त्याचे महत्त्व कळू शकेल, असे केंद्र सरकारचे नियोजन आहे.

Sengol : स्वातंत्र्याच्या १५ मिनिटे आधी नेहरूंना मिळाले होता 'सेंगोल'

तामिळनाडूचे मुख्य पुजारी (राजगुरु) नवीन राजाला सत्ता ग्रहण केल्यावर राजदंड देतात, अशी तामिळ परंपरा आहे. या परंपरेनुसार १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्‍या १५ मिनिटे आधी थिरुपापडुथुरई आधीनम् श्री ल श्री कुमारस्वामी तंबीरान यांनी विधिवत पूजनानंतर नेहरूंना हा सेंगोल हस्तांतरित केला होता.

स्वातंत्र्य दिनानंतर Sengol कुठे ठेवला हाेता?

स्वातंत्र्य दिन सोहळ्यानंतर हा सेंगोल प्रयागराज येथील नेहरू घराण्याचे हे वडिलोपार्जित निवासस्थान आनंद भवनात ठेवण्यात आला होता. १९६० च्या दशकात आनंद भवनचे संग्रहालयात रूपांतर झाले. शंकराचार्यांनी १९७५ मध्ये त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. त्यानंतर १९७८ मध्ये कांची मठाच्या 'महा पेरियाव' यांनी ही घटना एका शिष्याला सांगितली. नंतर ही घटनाही प्रसिद्ध झाली. गेल्या वर्षी तामिळनाडूतील स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त ही घटना पुन्हा एकदा समोर आली होती.

'सेंगोल' पुन्‍हा चर्चेत कसा आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीड वर्षापूर्वी 'सेंगोल'च्या ऐतिहासिक घटनेबद्दल सांगण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने ते देशातील प्रत्येक संग्रहालयात त्याचा शोध घेण्यात आला. तो प्रयागराजच्या संग्रहालयात असल्‍याची माहिती समोर आली. यानंतर त्याची सत्यता पडताळण्‍यात आली.

सेंगोल सुव्यवस्थेचे प्रतीक

सेंगोल प्राप्त करणार्‍या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश असल्‍याचे मानले जाते. जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी हे कधीही विसरू नये, यासाठी सेंगोल हे सुव्‍यवस्‍थेचे प्रतीक असल्‍याचेही मानले जाते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT