Latest

Hamas organization : हमास संघटना नेमकी काय आहे?

Arun Patil

पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने गाझापट्टीमधून इस्रायलवर अचानक हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलवर हल्ला करणारी 'हमास' संघटना नेमकी काय? त्यावर एक द़ृष्टिक्षेप.

हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक प्रतिकार चळवळ. 1987 साली पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादा (उठाव) दरम्यान या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेला शियापंथीय इराणचा पाठिंबा आहे. हमास ही संघटना 1920 च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीला मानते. 2007 पासून हमासची गाझापट्टीवर सत्ता आहे. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फतह चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाझापट्टीवर हमासने वर्चस्व स्थापन केले. 2006 मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासने गाझापट्टी ताब्यात घेतली. तेव्हापासून हमास आणि इस्रायलमध्ये अनेकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यामध्ये बर्‍याच वेळा हमासने गाझामधून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. तर इस्रायली सैन्यांनी हवाई हल्ले करत गाझावर बॉम्बफेक केली.

हमासने यापूर्वी गाझापट्टीला इस्रायलचे राज्य म्हणून मान्यता देण्यास विरोध केला आहे. तसेच 1990 च्या दशकात इस्रायल आणि पीएलओने केलेल्या 'ओस्लो शांतता करारा'ला हमासने हिंसक विरोध केला होता.

इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड ही हमासची सशस्त्र संघटना आहे. या संघटनेद्वारे बंदूकधारी लोक आणि आत्मघाती बॉम्बर्स इस्रायलमध्ये पाठवले जातात. यामुळे इस्रायल, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपानने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गाझा हा हमासचा बालेकिल्ला आहे; मात्र पॅलेस्टाईनमधील इतरही काही प्रदेशात हमासचे समर्थक आहेत. कतारसह मध्य पूर्वेतील देशांमध्येही हमासचे समर्थक आहेत.

हमास नेते इस्माईल हनिय

इस्माईल अब्देल सलेम अहमद हनिय हे हमासचे आघाडीचे राजकारणी आणि पॅलस्टिनीयन नॅशनल ऑथोरिटीच्या दोन वादग्रस्त पंतप्रधानांपैकी एक पंतप्रधान. 2006 मध्ये पॅलेस्टाईनच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर हमासने सत्ता काबीज केली आणि हनिय पंतप्रधानपदी विराजमान झाले. राष्ट्राध्यक्ष महम्मद अब्बास यांनी हनिय यांना वर्षभरातच पंतप्रधानपदावरून पदच्युत केले. मात्र, हनिय या निर्णयाला जुमानले नाही.

गाझापट्टीत इस्रायली ताब्याला विरोध केल्यावरून अल्पकाळासाठी त्यांना कारागृहातही डांबले गेले. 1988 मध्ये त्यांना पुन्हा एकदा त्यांना इस्रायलमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. 1992 मध्ये सुटकेनंतर त्यांना लेबनॉनमध्ये धाडले गेले. वर्षभरानंतर गाझाला परतल्यानंतर त्यांना इस्लामिक विद्यापीठाचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे 2006 मध्ये ते हमासच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT