Latest

काय म्हणता, हजार रुपयातही निवडणूक लढवता येऊ शकते!

स्वालिया न. शिकलगार

नागपूर – हल्ली सुरू असलेल्या वारेमाप पैशाची उधळपट्टी सुरू असलेल्या निवडणुका बघितल्या की पैशाशिवाय काहीच शक्य नाही असेच आपल्याला वाटते. मात्र,केवळ एक हजार रुपयांच्या आत निवडणूक लढविणाऱ्यांची नागपुरातील उमेदवारांची संख्या बघितल्यावर निवडणूक काय कोणीही लढू शकतो असे वाटल्याशिवाय राहत नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी कमाल 95 लाख रुपये पर्यंतची खर्च मर्यादा, बंधन घालून दिलेले आहे. यापेक्षा खर्च अधिक होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाची चमू उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवून असते, तर उमेदवारांचे निवडणूक प्रमुख, तज्ज्ञ मंडळी, पोल मॅनेजर्स हा खर्च कसा आपल्या आवाक्यातच राहील याची वेळोवेळी तजबीज करीत असतात.

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकंदर 26 उमेदवार असताना काहींचा खर्च 50 लाखांच्या वर गेला असला तर काही उमेदवारांनी मात्र 500 ते 1000,5 हजार रुपयातच ही निवडणूक लढवली आहे. आहे ना गंमत. खरं म्हटलं तर इतक्या रुपयांमध्ये जवळच्या कार्यकर्त्यांचा कच्चा चिवडा, चहापाणी देखील देखील होऊ शकत नाही. नागपुरात यावेळी भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत काँग्रेसचे आमदार शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी होत आहे.

या दोघांमध्ये चुरशीचा मतसंग्राम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थातच मोठ्या सभा, रोड शो, हायटेक प्रचाराच्या बाबतीत गडकरींची यंत्रणा कितीतरी सरस होती असे असताना आज तरी विकास ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. अर्थातच ही आघाडी त्यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत आहे.

विकास ठाकरे यांनी सर्वाधिक 58 लाख 63 हजार रुपये खर्च केले आहेत तर भाजपचे नितीन गडकरी यांनी 56 लाख 51 हजार रुपये खर्च केल्याची नोंद निवडणूक आयोगाने केलेली आहे. या खालोखाल विशेष फुटाणे यांनी 3 लाख 84 हजार किवीनसुका सूर्यवंशी 2 लाख सहा हजार, टेकराज बेलखोडे तीन लाख 36 हजार, धनु वलथरे 2 लाख 60 हजार,साहिल तुरकर एक लाख 60 हजार, फहिम खान 1 लाख 28 हजार अशी खर्चाची अपक्ष उमेदवारांची नोंद आहे. आता प्रत्यक्ष खर्च,झालेला खर्च तफावत असल्यास अधिकचा खर्च करणाऱ्यांना निवडणूक आयोगामार्फत नोटीस पाठविली जाणार आहे.

काय खरे काय खोटे हे तर जनतेला माहितच आहे. कारण, ये जो पब्लिक है…सब जाणती है….!मात्र, काही उमेदवारांचा तर सत्कार समाजाने करायला हवा असाच त्यांचा निवडणुकीचा माफक खर्च आहे. महाल किल्ला रोड अर्थात गडकरी वाड्याजवळच राहणारे अपक्ष उमेदवार सचिन वाघाडे हे उच्च विद्याविभूषित असून तासिका तत्वावर प्राध्यापकीसोबतच ते शेतीही करतात. त्यांनी सर्वात कमी केवळ 500 रुपयांची प्रसिद्धीपत्रके छापली. 25 हजार अनामत रक्कम, 100 रुपयांचा स्टॅम्प असा खर्च केला. अपक्ष गुणवंत सोमकुवर यांनी 7500, श्रीधर साळवे यांनी 4500 रुपये खर्च केले. दरम्यान,संतोष लांजेवार, सूरज मिश्रा, सुनील वानखेडे, आदर्श ठाकूर, गुरूदाद्री आनंदकुमार या उमेदवारांचा निवडणूक खर्च चार आकड्यातच अर्थात हजारातच आहे.

SCROLL FOR NEXT