Latest

‘तोशिबा’ची पडझड कशामुळे?

Arun Patil

उद्योगी लोकांचा देश असणार्‍या जपानमधील अनेक कंपन्यांनी जागतिक पटलावर आपला वरचष्मा निर्माण केला आहे. तोशिबा ही यापैकीच एक कंपनी. टीव्ही, संगणक, स्पीकर यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात तोशिबाची दादागिरी होती. जपानी तंत्रज्ञानाचा मेरुमणी म्हणून या कंपनीकडे पाहिले जात होते. पण आज ही कंपनी जपानी शेअर बाजारामध्ये राहण्यास अपात्र ठरली आहे.

जपान हा उद्योगी लोकांचा देश म्हणून जगभरात ख्यातकीर्द आहे. नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे बेचिराख झालेल्या जपानने या उद्योगीपणाच्या आणि नियोजनबद्ध धोरणांच्या सहाय्याने फिनिक्स पक्ष्यासारखी आर्थिक भरारी घेतली आणि जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानावर हा देश जाऊन बसला. आज चिनी बनावटीच्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत जशी नकारात्मकता जगभरात आढळते, त्याउलट स्थिती जपानी तंत्रज्ञानाबाबत आणि निर्मितीबाबत, गुणवत्तेबाबत पाहायला मिळते. त्यामुळेच जगभरात 'मेड इन जपान' वस्तू वापरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या क्षेत्रापासून अनेक क्षेत्रांत जपानी कंपन्यांनी दबदबा निर्माण केलेला होता. 'तोशिबा' ही यापैकीच एक कंपनी. एकेकाळी जपानमध्येच नाही, तर जगभरात इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या क्षेत्रात या कंपनीने धुमाकूळ घातला होता. परंतु आज ही कंपनी रसातळाला पोहोचली आहे. परिणामी तिचे नाव टोकिओ शेअर बाजारातून वगळले आहे. दहा-बारा नाही, तर सुमारे 74 वर्षांपर्यंत शेअर बाजारात दबदबा निर्माण करणार्‍या तोशिबाची एवढी पडझड का झाली?

1980-90 च्या दशकांत तोशिबाचा सर्वत्र गाजावाजा होता. या काळात अनेक देशांत दळणवळण आणि सुविधांचा विकास होऊ लागल्याने तोशिबाने वाजवी किमतीत लोकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध करून दिली. त्यामुळे अल्पावधीतच या कंपनीची भरभराट झाली. मध्यम आणि उच्चवर्गीयांच्या घरात तोशिबाचे कोणते ना कोणते उत्पादन असायचे. मग टीव्ही असो, संगणक असो, स्पीकरसह अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो, त्यात तोशिबाचे तंत्रज्ञान वापरलेले असायचे. जपानी तंत्रज्ञानाचे आदर्श उदाहरण म्हणून तोशिबाकडे पाहिले जात असे. पण आज ही कंपनी टोकिओ स्टॉक एक्स्चेंजमध्येही तग धरू शकलेली नाही. तोशिबाच्या आर्थिक स्थितीत गेल्या 10 वर्षांत कमालीची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील तोशिबाच्या उपकरणांना मागणी घटल्याने आणि कंपनीत गैरव्यवहार व उलथापालथ होऊ लागल्याने कंपनी मालकांवर आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

थोडेसे भूतकाळात डोकावल्यास तोशिबाची अधोगती 2015 पासून सुरू झाली. यादरम्यान कंपनीच्या वेगवेगळ्या ब—ँच, युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊ लागले. यात बड्या अधिकार्‍यांचे नावही येऊ लागले. या प्रकरणात खोलवर गेले असता नफ्याचे आकडे फुगवल्याचे निदर्शनास झाले. कंपनीने सात वर्षे सादर केलेले नफ्याचे आकडे प्रत्यक्षापेक्षा कैकपटींनी कमी असल्याचे दिसून आले. तोशिबाला होणारा प्रत्यक्ष फायदा हा तुलनेने कमीच होता आणि तो फायदा वास्तवापेक्षा सुमारे एक हजार 159 अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले होते.

2020 मध्ये आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आणि त्याची पाळेमुळे कंपनीबाहेरही असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या प्रशासकीय पातळीवरही अनियमितता असल्याचे आढळून आले. समभागधारकांसाठी निर्णय घेतानाही अनेक प्रकारच्या नियमबाह्य गोष्टी केल्याचे उघड झाले आहे. तोशिबाने देशाच्या वाणिज्य मंत्रालयाशी मिलीभगत करत परकीय गुंतवणूकदारांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांच्या मते, यासह अनेक कारणांमुळे अनेक परकीय गुंतवणूकदार जपानमध्ये गुंतवणूक करण्यास बिचकत होते आणि तोशिबाने केलेल्या गैरप्रकारामुळे जपानच्या शेअर बाजाराचे नुकसान झाले आहे.

जपानला भूकंपाचे नुकतेच धक्के बसले आहेत. परंतु तोशिबाच्या रूपातून गुंतवणूकदारांना अनेक धक्के सहन करावे लागले. अमेरिकेची वेस्टिंग हाऊस इलेक्ट्रिक कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर तोशिबाला धक्का बसला. वास्तविक 2016 मध्ये तोशिबाने एक अणुवीज प्रकल्प निर्मिती करण्याची घोषणा केली आणि 2015 मध्ये हा प्रोजेक्ट वेस्टिंग हाऊसने खरेदी केला होता. मात्र वर्षानंतर वेस्टिंग हाऊस दिवाळखोरीत निघाले आणि तोशिबाचा बहुचर्चित अणुऊर्जा प्रकल्पाचा व्यवसाय डब्यात गेला. या प्रस्तावित प्रकल्पापोटी झालेली 6 अब्ज डॉलरची उलाढाल अडचणीत सापडली. यासाठी तोशिबाला मोबाईल फोन आणि मेडिकल उपकरणाचे युनिटही विकावे लागले.

तोशिबा मेमरी नावाने चिप तयार करणारी कंपनी बाजारात उतरली. मात्र करारानंतरही अनेक महिने त्याचे काम पुढे सरकले नाही. कारण या कंपनीचे अन्य भागीदार कंपन्यांंशी वाद झाले. त्यामुळे तोशिबासमोर आर्थिक अडचणी वाढतच गेल्या. एकीकडे जगभरातील कंपन्या भविष्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असताना नामांकित राहिलेल्या तोशिबाला पैसे उभारण्यासाठी मालमत्ता विकावी लागली. त्यानंतर तर कंपनी शेअर बाजारातून बाहेर पडण्याच्या स्थितीत आली. मात्र 2017 मध्ये बुडत्या कंपनीला काडीचा आधार मिळाला. या वर्षी 514 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक मिळाली. पण त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. या चढउतारामुळे कंपनीवर विक्री करण्याची वेळ आली. जून 2022 मध्ये 8 खरेदीदारांचे प्रस्ताव आले आणि शेवटी 2023 च्या प्रारंभी जपानचा गुंतवणूक समूह इन्व्हेस्टमेंट कॉर्पने तोशिबाची 14 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली.

SCROLL FOR NEXT