Latest

मिठाच्या अधिक सेवनाचा कसा होतो परिणाम?

Arun Patil

नवी दिल्ली : 'अति सर्वत्र वर्जयेत' म्हणजेच कुठेही, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हे लक्षात ठेवणे गरजेचे असते. मीठ असो किंवा साखर, हे दोन्ही सफेद पदार्थ गरजेपुरतेच घेणे हितकारक ठरत असते. मिठाशिवाय जेवण अळणी, बेचव होत असते. त्यामुळे मीठ अगदीच टाळून चालत नाही. मात्र, आधुनिक काळात मिठाचा वारेमाप वापर केलेले अनेक पदार्थ बाजारात मिळत असतात. अशा अतिरिक्त मिठाचा शरीरावर हानिकारक परिणाम होत असतो. तो नेमका कसा होतो हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

मिठात सोडियम असते व ठराविक प्रमाणापेक्षा जास्त सोडियम खाल्लं तर अनेक आजारांचा धोका संभवतो. आपण टेबलसॉल्ट म्हणून जे मीठ खातो ते मूलतः सोडियम क्लोराईड असतं. त्यात 40 टक्के सोडियम आणि उर्वरित क्लोराईड असतं. आपण बहुतेक सोडियम मिठातून घेत असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेपेक्षा जास्त सोडियमचे सेवन करते. एक प्रौढ व्यक्ती एका दिवसात जवळपास 4310 मिलिग्रॅम इतके सोडियमचे सेवन करते. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा साधारण दुप्पट आहे. या संस्थेने सुचवलेले सोडियमचे प्रमाण प्रतिदिन 2000 मिलिग्रॅम इतके आहे, जे सुमारे 5 ग्रॅम मीठ आहे. सोडियम हा मिठाचा एक घटक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हा घटक पेशींमधला प्लाझ्मा राहण्यासाठी, शरीरातील क्षार आणि पेशींचे कार्य संतुलित राहावे यासाठी आवश्यक आहे. सोडियमचे अतिरिक्त सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार प्रौढ व्यक्तीने प्रतिदिन 2000 मिलिग्रॅम सोडियम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. 2 ते 15 वर्षांच्या वयातील मुलांसाठी आवश्यकतेनुसार त्याचे प्रमाण कमी करावे. गरोदरपणात महिला प्रतिदिन 1500 मिलिग्रॅम सोडियम खाऊ शकतात. आहारातल्या मिठात आयोडिन असलं पाहिजे. त्यामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासाला गती येते तसेच वृद्धांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होते.

युनायटेड किंग्डमची आरोग्यसेवा एनएचएसच्या माहितीनुसार प्रौढ व्यक्तींनी प्रतिदिन 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हे साधारण एका चमच्याएवढे आहे. परंतु, आपल्या जेवणात याच्या दुप्पट प्रमाण असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सोडियमयुक्त पदार्थ जास्त खाल्ले तर रक्तदाब वाढतो. त्याशिवाय हृदयरोग, गॅस्ट्रिक कॅन्सर, लठ्ठपणा, ओस्टिओपोरोसिस, मेनियार्स नावाचा कानाचा रोग होऊ शकतो. या संस्थेच्या माहितीनुसार अतिरिक्त सोडियमसेवनामुळे जगभरात दरवर्षी 19 लाख लोकांचा मृत्यू होतो. कारण अधिक सोडियम सेवन हे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचे एक मुख्य कारण आहे. एनएचएसच्या माहितीनुसार जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हार्टअ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जर तुम्ही भरपूर मीठ खाल्लं तर सोडियम, पोटॅशियम, फॉस्फेटचे प्रमाण वाढून आजार वाढू शकतात.

हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांना जास्त नुकसान होते. त्यातही ज्या रुग्णांना डायलिसिस करावं लागतं त्यांना जास्त त्रास संभवतो. क्रिएटिनिनची पातळी वाढल्यामुळे मूत्रपिंडाचं नुकसान होतं आणि उच्च रक्तदाबाच्या लोकांना जास्त त्रास होतो. हृदयरोगात पहिलं पाऊल उच्च रक्तदाबाचं असतं. मग कोलेस्ट्रॉल वाढतं मग हृदयविकाराचा धक्का आणि स्ट्रोक असतो. लोक अजाणतेपणी भरपूर मीठ खात असतात. खरंतर त्यावर ताबा आणला पाहिजे. आपण आहारातून जे मीठ खातो त्यातील तीन-चतुर्थांश मीठ फक्त पाकीटबंद खाण्यातूनच घेत असतो. सॉसेज, प्रक्रिया केलेले मांस, पेस्ट्री, पिझ्झा, प्रक्रिया केलेले पनीर, चिप्स, खारवलेले मसालेदार पदार्थ, वेगवेगळे सॉस, केचप या पदार्थांना लांबच ठेवलं पाहिजे. सामान्यतः प्रक्रिया न केलेले पदार्थ जसे की फळे, भाज्या, पूर्ण धान्ये, कठीण कवचाची फळे, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यात सोडियम कमी असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT