Latest

Weather Report : राज्यात थंडीचा जोर वाढला, किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : Weather Report : राज्यावर पावसाचे संकट असले तरी त्याची तीव्रता कमी होणार आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यभर वाढलेला थंडीचा कडाका कायम राहणार आहे. किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. राज्यातील सर्वच भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान औरंगाबाद शहर व जिल्ह्याचे किमान तापमान गेल्या दोन दिवसांपासून नीचांकी नोंदले आहे. शनिवारीदेखील शहराचे तापमान 7.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदले आहे.

Weather Report :  बंगालच्या उपसागरात तयार झालेले मदौस चक्रीवादळ गेल्या दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकले होते. मात्र, हे चक्रीवादळ भूपृष्ठभागाकडे सरकल्यानंतर त्याची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. मात्र, या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (विशेषत: दक्षिण महाराष्ट्र), मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Report :  तर काही हवामान अभ्यासकांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या सर्वच शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. ही घट चार ते पाच अंश सेल्सिअसच्या आसपास असून, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे.

Weather Report : किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट
मदौस चक्रीवादळाची तीव्रता घटली
सर्वच भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

मदौस चक्रीवादळ भूपृष्ठ भागाकडे सरकल्यानंतर त्याची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडेल असा अंदाज असला तरी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे. या उलट हवेचा दाब वाढल्यामुळे थंडी वाढणार आहेे.
                                           – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक

SCROLL FOR NEXT