Latest

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापण्यास तयार

Arun Patil

पणजी ; सुरेश गुदले : महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार आपल्या कर्माने पडेल. असे सरकार पाडण्याची गरज नाही. ते पडावे म्हणून भाजप प्रयत्न करीत नाही. महाराष्ट्र सरकार पडलेच तर मात्र पर्यायी सरकार देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी निवडणूक प्रभारी म्हणून काम केले. या निमित्ताने निकालाच्या दिवशी ते गोव्यात होते. त्यांच्याशी दै. पुढारीने संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात होणार्‍या 2024 मधील निवडणुकीची तयारी आतापासून करीत आहे.2024 साठी पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांच्यामध्ये कमालीचा उत्साह आहे. सर्वजण एकजुटीने पुढील निवडणुकीच्या तयारीस लागलो आहोत. सध्याचे भ्रष्ट सरकार यापुढे टिकणार नाही. आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. सरकार पडलेच तर मात्र आम्ही पर्यायी सरकार स्थापन करण्यास तयार आहोत.

महाराष्ट्रातही राजकीय परिणाम

गोव्यासह अन्य राज्यांच्या निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावरही निश्‍चितच परिणाम होईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्‍त केला. पंतप्रधान मोदी भाजपचे बॅ्रण्ड अ‍ॅम्बॅसिडर आहेत. त्यांचा कल्याणकारी राज्यांप्रतीचा दृष्टिकोन जनतेला पटलेला आहे, याचेच फळ निवडणुकीच्या निकालाने भाजपला मिळालेले आहे. असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

फडणवीसांची शिष्टाई यशस्वी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय झालेली ही पहिली निवडणूक. या निवडणुकीची जबाबदारी प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. यानिमित्ताने गोव्यासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गोव्यातील चाळीसही मतदारसंघात त्यांनी दौरे केले होते. दीड ते दोन महिने ते गोव्यात तळ ठोकून होते. पक्षातील अनेक अंतर्गत पेचप्रसंगामध्ये त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली. याविषयी ते म्हणतात, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा विजय गोव्यातील सर्वसामान्य जनतेचा आहे.

SCROLL FOR NEXT