पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आणि भारत या नावावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरुद्ध भारत नावाच्या वादावर प्रतिक्रिया देत भाजप विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. ( INDIA vs BHARAT Row )
'इंडिया' आणि 'भारत' या नावांच्या वादावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही आमच्या आघाडीचे नाव बदलू I.N.D.I.A. या नावामुळे देशाचा खर्च वाढू शकतो, असे वाटत असेल तर आघाडीचे नाव बदलण्याचा विचार करू शकतो. या नावामुळे आम्हाला देशवासीयांना त्रास द्यायचा नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही भारत आणि भारत वादावर I.N.D.I.A युतीचे नाव बदलण्याचे संकेत दिले होते. त्यांनी पोस्ट केले हाेते की, "आम्ही स्वतःला भारत आघाडी म्हणू शकतो. मात्र यानंतर सत्ताधारी पक्षांनीही हा खेळ थांबवला पाहिजे."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया की भारत नावाच्या वादावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, हा देश १४० कोटी जनतेचा आहे. कोणत्याही पक्षाने युती केल्यास भाजप देशाचे नाव बदलेल का?, असा सवालही केजरीवाल यांनी केला.
G-20 मध्ये सामील होणाऱ्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन राष्ट्रपतींकडून केले जाणार आहे. त्यामुळे जेवणाचे निमंत्रण पत्रावर 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनीही या निमंत्रण पत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.