पुणे : 'आमच्याकडे लायसन्स आहे, आणि आम्हाला थांबवून तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका,' असे लिहिलेले फलक हाती घेऊन पुणेरी तरुणाईने इन्स्टा रील्स करून वाहतूक पोलिसांना पुणेरी भाषेत चांगलेच टोमणे मारले आहेत. वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून सध्या चौकाचौकात दुचाकीस्वारांना थांबवून जोरदार कारवाई सुरू आहे.
त्यामुळे वैतागलेल्या पुणेकर तरुणाईने मुठा नदीपात्रात इन्टाग्रामच्या माध्यमातून एक रील्स तयार केले आहे. त्यात त्यांनी दुचाकीवरून जात असताना वारंवार गाडी बाजूला घेण्यास सांगणार्या वाहतूक पोलिसांना टोमणे मारले आहेत. यात दोन तरुण दुचाकीवरून जाताना आणि नदीपात्रातील घाटावर एक फलक हाती घेतलेले दिसत आहेत. त्या फलकावर 'लायसन्स आहे, थांबवून आमचा आणि तुमचा वेळ घालवू नये,' असे लिहिलेले आहे. या व्हिडीओला 'आम्ही पुणेरी…' हे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 12 हजार 300 'लाईक्स' आले आहेत. तर हा व्हिडीओ 'इन्स्टा'वरच 3,369 जणांनी शेअर केल्याचे दिसत आहे.
हेल्मेटचा आणि आमच्या 36 चा आकडा…
याच व्हिडीओमध्ये दुचाकीवरून जाणार्या तरुणांच्या हातातील फलक पाहून जाताना एक तरुण त्यांना विचारतो की, ठीक आहे, तुमच्याकडे लायसन्स आहे. पण हेल्मेट कुठे आहे? त्यावर दुचाकीवरून जाणारा तरुण त्याला म्हणतो, 'आमचा आणि हेल्मेटचा 36 चा आकडा आहे.' यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलिस यांच्यात वाहतूक नियमांवरून चांगलीच धुमसत असल्याचे दिसत आहे.
सर्वाधिक अपघात दुचाकींचेच
शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांत पुणे आरटीओने केलेल्या अभ्यासात दुचाकीस्वारांचेच सर्वाधिक अपघात होत असल्याचे समोर आले आहेत. यात अनेक तरुणांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच, सर्वाधिक अपघात सायंकाळच्या सुमारास होत असून, वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेच झाले असल्याचेही समोर आले आहे.
पुण्यात रोज एक अपघाती मृत्यू…
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर परिसरात जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत 96 अपघातांमध्ये 100 वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. यावरून दिवसाला एक अपघाती मृत्यू होत असल्याचे आहे. मात्र, तरीदेखील पुणेकर याकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे.
वाहतूक नियमांचे पालन हे सर्वांनीच करायला हवे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, वाहतूक पोलिसांनीसुध्दा सिग्नल सोडून कोपर्याला दडी मारून, अशाप्रकारे कारवाई करणे चुकीचे आहे. पोलिसांनी जागोजागी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देऊन, वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करावी.
– सिध्देश वाघ, युवक