Latest

पुणे विभागात पाणीबाणी ! हिवाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ऑगस्ट महिन्यामध्ये विभागातील पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत 155 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, तर ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात टँकरसंख्येत घट झाली असली, तरी आजच्या तारखेत 130 टँकरद्वारे दोन लाख 15 हजार नागरिकांना पाणी पुरवावे लागत आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने पुणे विभागात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. यंदा मान्सून विलंबाने सक्रिय झाला, तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे कृष्णा आणि भीमा खोर्‍यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, दुसरीकडे पुणे विभागातील कोल्हापूरवगळता उर्वरित पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील 118 गावांत टँकरच्या माध्यमातून तहान भागवली जात आहे.

संबंधित बातम्या :

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र असून, 74 गावे आणि 329 वाड्यांतील एक लाख 6 हजार 721 नागरिकांना आणि 70 हजार 546 जनावरांना 80 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातही 35 टँकर सुरू असून, 30 गावे आणि 257 वाड्यांतील 73 हजार 288 नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात 4 गावे आणि 35 वाड्यांमधील 10 हजार 601 नागरिक आणि आठ हजार जनावरांना 4 टँकरच्या मदतीने पाणी पुरविले जात आहे. ऑगस्टमध्ये 37 गावे आणि 274 वाड्यांतील 98 हजार नागरिकांना 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. सद्य:स्थिती पाहता, पुणे जिल्ह्यामध्ये टँकरसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये केवळ दहा गावे आणि 61 वाड्यांतील 22 हजार नागरिकांना 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

SCROLL FOR NEXT