Latest

सोलापुरात पाणीबाणीचे संकट!

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जून उजाडला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. दुसरीकडे उजनी धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर जलसंकट येण्याची शक्यता आहे. सध्या उजनीत वजा 30 टक्के पाणी आहे. वजा 35 टक्के पाणी पातळी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उजनीतून दुबार पंपिंग करून पाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.

महापालिका अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 22) उजनी धरण परिसराची पाहणी केली. यावेळी पाणीपातळी घटत चालली असल्याचे दिसून आले. दरम्यान, सध्या आषाढी यात्रा असल्याने उजनीतून पाणी सोडण्यात येत आहे. 4500 क्यूसेकने भीमा नदीत उजनीतून पाणी सोडले आहे. यानंतर उजनी धरणातील पातळी आणखी कमी होणार आहे. वेळेत पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तसे न झाल्यास ही पातळी अधिक घटणार आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने उजनी धरणात दुबार पंपिंगचे नियोजन केले आहे. त्याची कार्यवाही ही पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुधवारी चाचणीही पूर्ण केली आहे.

दुबार पंपिंगची यंत्रणा साधारणत: 25 जूनपासून कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला 10 एचपीचे 30 पंप, 20 एचपीचे दोन पंप आणि 30 एचपीचे दोन पंप अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान, दुबार पंपिंगसाठी पंप, पाईप, इलेक्ट्रिक पॅनल पाच वर्षांपूर्वीच घेण्यात आले आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एजन्सी नेमून कर्मचारी कंत्राट पद्धतीने घेण्यात आले आहेत. या कामगारांचा खर्च दहा ते पंधरा लाख रुपये होणार आहे. पंपासाठी 55 लाख रुपये खर्च आहे, असेही कारंजे यांनी सांगितले.

अर्धा तास कमी पाणीपुरवठा

शहराला सध्या चार दिवसांआड तीन तास पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी पातळी घटल्याने पुढील नियोजन करण्याकरिता 15 ते 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या तीन तासांपैकी अर्धा तास पाणीपुरवठा कमी होणार असल्याचेही कारंजे यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT