जळगाव, पुढारी वृत्तसेवा : 'अल निनो'च्या प्रभावामुळे तापमान वाढणार असून, पावसाळाही लांबण्याचा अंदाज असल्याने राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी गरज पडली तर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, याकरिता गावनिहाय आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मागील वर्षी राज्यात पाऊस चांगला झाला असल्याने राज्यातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा असला, तरी वाढत जाणार्या उन्हामुळे पाणीसाठ्यांत झपाट्याने घट होत आहे. तसेच 'अल निनो'च्या प्रभावामुळे उष्णतामान वाढणार आहे आणि पावसाळा लांबण्याचाही अंदाज आहे. अशा स्थितीत राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पावसाळा लांबल्यास मुंबईत पाणी कपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दोन महिने आणि त्यानंतरचे जून व जुलै महिने, असे एकूण चार महिने या धरणांतील पाणीसाठ्यावर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.
पाणी जपून वापरा : गुलाबराव पाटील
संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे सांगत गुलाबराव पाटील म्हणाले की, वेळ पडलीच तर पाणी कपातीचा निर्णयही घेतला जाईल. त्यामुळे आतापासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. सध्या पाणीटंचाईचे सावट नसले, तरी राज्य सरकार त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. त्यासाठी नियोजन करण्यात येत असून, गावनिहाय आराखडे तयार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.