Latest

हात, चेहरा, पोटाचे स्नायू सुजतात का? वॉटर रिटेन्शनचे कारण काय?

अनुराधा कोरवी

व्यक्तीचे वजन संतुलित राहत नसेल आणि दर दुसर्‍या दिवशी वजन कमी-जास्त होत असेल तर त्या व्यक्तीला वॉटर रिटेन्शन हा त्रास असू शकतो. वॉटर रिटेन्शनमध्ये शरीराच्या अवयवांत पाणी जमा होते, ज्यामुळे शरीरातील काही अवयव, जसे हात, चेहरा व पोट यांचे स्नायू सुजतात. ( water retention )

संबंधित बातम्या 

वॉटर रिटेन्शनची समस्या भेडसावत असेल तर पाय, टाचा आणि पाय यांच्यामध्ये वेदना होतात. हा त्रास तेव्हाच होतो, जेव्हा शरीरातील खनिजांची पातळी संतुलित राहू शकत नाही. त्यामुळे शरीराच्या पेशींमध्ये पाणी जमा होते आणि त्यामुळे शरीर फुगते. आपल्यापैकी कुणाला शरीरावर अशी लक्षणे दिसत असतील, तर घाबरू नये; पण वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. तसेच पौष्टिक आहार घ्यावा. त्यामुळे आजारपणापासूनही मुक्तता मिळवू शकतो.

वॉटर रिटेन्शनचे कारण

वॉटर रिटेन्शन अनेक कारणांमुळे होऊ शकते. मिठाचे अतिसेवन हे त्याचे प्रमुख कारण आहे. मिठाचे अतिसेवन केल्यास शरीरात सोडियमची पातळी वाढते. त्यामुळे वॉटर रिटेन्शनपासून मुक्त होण्यासाठी आपल्या आहारात मिठाचा योग्य आणि कमीत कमी प्रमाणात वापर करावा. महिलांमध्ये हार्मोनल संतुलन, साखरेचे अतिसेवन, हृदय आणि यकृत यांचे गंभीर आजार हेदेखील वॉटर रिटेन्शनचे कारण ठरू शकतात.

काय खावे?

मॅग्नेशियममुळे शरीरातील पाण्याचे अतिप्रमाण म्हणजेच वॉटर रिटेन्शन दूर होते. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि दाणेवर्गीय पदार्थ असावेत.

बटाटा, केळे आणि अक्रोड यामध्ये बी 6 जीवनसत्त्व असते आणि वॉटर रिटेन्शन दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी आपल्या आहारात बटाटा, अक्रोड आणि केळे अवश्य सामील करावे. सी जीवनसत्त्व असणार्‍या पदार्थांचे सेवन केल्यास फायदा होईल.

संत्रा, गाजरासारख्या फळांचे नियमित सेवन केल्यास सतत लघवीची प्रवृत्ती होते. त्यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते. तणावामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत. वॉटर रिटेन्शनपासून बचावासाठी तणाव नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमितपणे योगा आणि कमीत कमी अर्धा तास व्यायाम जरूर करावा.

आहारातील पथ्ये

डबाबंद खाद्यपदार्थांचे सेवन बंदच करावे; कारण या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि चव वाढवणारे घटक असतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्यास पाण्याचे प्रमाण वाढते. जर एखाद्या व्यक्तीला वॉटर रिटेन्शनचा त्रास आधीपासूनच असेल, तर ही परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.

ब्रेड आपल्या आहारातून बादच करावा. कोणत्याही प्रकारचे रिफाईंड पदार्थ आपल्या आहारात सामील करू नयेत. या पदार्थांचे सेवन केल्यानंतर इन्सुलिनचे प्रमाण बिघडते. त्यामुळे वॉटर रिटेन्शन वाढू शकते.

अल्कोहोलचे सेवन आणि धूम्रपान यांच्यापासून दूर राहावे. अल्कोहोल घेतल्याने जास्त वेळा लघवी होत असेल, तरीही नंतर शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे शरीरातील खनिजे कमी होतात. ( water retention )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT