Latest

वाई : ‘किसन वीर’चा आज फैसला

backup backup

वाई; पुढारी वृत्तसेवा : आ. मकरंद पाटील हे पूर्ण ताकदीनिशी यंदाच्या किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उरल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली. आ. मकरंद पाटील आणि मदनदादा भोसले या दोन्ही गटांनी किसन वीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली. त्यामुळेच तब्बल सुमारे 70 टक्के मतदान झाले. मतदानाचा वाढलेला हा टक्का कोणाला धक्का देणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गुरुवारी किसन वीरचा फैसला होणार असून किसनवीच्या फडात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला परंतु, डबघाईला आलेल्या किसन वीर कारखान्यासाठी कृष्णेकाठी परंपरागत पाटील व भोसले घराण्यातच संघर्ष झाला. गत दोन निवडणुका न लढवणारे आ. मकरंद पाटील यांनी किसन वीरची निवडणूक लढवण्याचे जाहीर करताच
किसनवीरच्या निवडणुकीत रंगत भरणार हे निश्चित झाले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रथमच 340 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले.

या निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांना राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकार्‍यांनी साथ दिली. तर मदनदादा भोसले यांना सेनेचे आ. महेश शिंदे यांच्यासह काँग्रेसने साथ दिली. त्यामुळे यंदा किसनवीरसाठी तुल्यबळ लढत होणार असल्याचे संकेत मिळाले. अर्ज माघारीनंतर 21 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात राहिले. प्रचाराच्या कालावधीत दोन्ही गटांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले. किसनवीर ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांकडून सहाही तालुक्यात प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवण्यात आली.

मंगळवारी कारखान्यासाठी 154 मतदान केंद्रावर 69.31 टक्के मतदान झाले. 52 हजार 90 पैकी सुमारे 36 हजार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले नव्हते. मात्र, यंदा मतदानाचा टक्का वाढला असून गुरूवारी किसनवीरचा फैसला होणार आहे. यामध्ये सत्तेचे पारडे कोणाच्या बाजूकडे झुकते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गुरूवारी होणार्‍या मतमोजणीसाठी सहकार विभागाने जय्यत तयारी केली आहे. वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणीचे काम होणार आहे. यासाठी 350 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत वैयक्तिक ऊस उत्पादक सभासदांसाठी 20 व संस्था सभासदांसाठी 9 मतपत्रिका होत्या. त्यामुळे प्रत्येक पेटीत किमान 3 ते 4 हजार मतपत्रिका राहणार आहे.

मतमोजणी करण्यासाठी 77 टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर 4 कर्मचारी असणार आहेत. सकाळी 8 वाजता मतपत्रिका पेटीतून बाहेर काढणे, त्याचे वर्गीकरण करून गठ्ठे बांधले जाणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीस 11 वाजणार आहेत. किसनवीरचा पहिला निकाल येण्यास दुपारी 1 वाजणार आहे. तर अंतिम निकाल हा रात्री 9 वाजता हाती येणार आहे. ही मतमोजणी केंद्रनिहाय होणार आहे.
मतमोजणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात 14 सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. तसेच डीवायएसपी शीतल

खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब भरणे, सपोनि विजय शिर्के, आशिष कांबळे, रविंद्र तेलतुंबडे, कृष्णराज पवार यांच्यासह सहकार्‍यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT