Latest

Waheeda Rehman : बहुगुणी अभिनेत्री

Arun Patil

हिंदी चित्रपटातील कोणत्याही अभिनेत्रीला आजवर वहिदाइतका (Waheeda Rehman) आदर व सन्मान मिळालेला नाही. चित्रपट क्षेत्रातील नवनवीन पिढ्यांमधील नायक-नायिका असोत अथवा दिग्दर्शक, त्यांना वहिदाबरोबर काम करता यावे, असे नेहमी वाटत असते. खुल्या मनाने बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती वहिदाकडे असल्यामुळे ती आज 85 वर्षांची असली, तरी कालबाह्य वाटत नाही.

मुख्य धारेच्या हिंदी चित्रपटांमधील सशक्त आणि बहुगुणी अभिनेत्री वहिदा रेहमान (Waheeda Rehman) हिला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' मिळणे हे अत्यंत योग्य असून, त्याबद्दल अवघ्या भारतवासीयांना आनंद होणे स्वाभाविक आहे. हिंदी चित्रपटांतील अल्टिमेट सौंदर्यवती म्हणजे मधुबाला. वहिदाला अनुपम खेरने 'तुमच्याइतके अनुपम सौंदर्य कोणाचेही नव्हते,' असे म्हटल्यावर, वहिदाने स्वतःहून मधुबालाचा उल्लेख केला आणि मी सुंदर नाही, असे ठामपणे सांगितले. ज्यावेळी सुशिक्षित घरातील मुली चित्रपट क्षेत्रात फारशा येत नव्हत्या, तेव्हा तुम्ही आलात, अशी कॉम्प्लिमेंट कुणीतरी दिली, तेव्हा बीना राय, आशा माथुर (मयूरपंख, लाखों में एक, नक़ाब) अशा नायिका तोपर्यंत रुपेरी दुनियेत आल्या होत्या, अशी माहिती वहिदाने आवर्जून दिली. वहिदाचे मोठेपण म्हणजे, तिने कधीही स्वत:चे मोठेपण ना मिरवले, ना सांगितले. आपल्या आधी आशा पारेखला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, याबद्दल वहिदाने किंचितही खंत व्यक्त केली नाही. उलट, आपल्या मैत्रिणीला तो सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला.

हिंदी चित्रपटातील कोणत्याही अभिनेत्रीला आजवर वहिदाइतका आदर व सन्मान मिळालेला नाही. चित्रपट क्षेत्रातील नवीन पिढ्यांमधील नवनायक-नायिका असोत अथवा दिग्दर्शक, त्यांना वहिदाबरोबर काम करता यावे, असे नेहमी वाटत असते. ट्विंकल खन्ना असो किंवा अनुष्का शर्मा, यांसारख्या नट्या वहिदाला भेटण्यास नेहमी उत्सुक असतात. अमिताभ बच्चनची सर्वात आवडती अभिनेत्री वहिदा असून, जयाच्या आधी वहिदा भेटली असती तर ती सहचरी म्हणून अधिक पसंत पडली असती, असे गमतीने एकदा अमिताभ म्हणालाही होता. 'महान', 'नमकहलाल', 'अदालत' यांसारख्या चित्रपटांत अमिताभने वहिदाबरोबर काम केले. तर अभिषेकने 'ओम जय जगदीश' तसेच 'दिल्ली 6' या चित्रपटांत वहिदाच्या सावलीखाली काम केले. त्यातील 'ससुराल गेंदा फूल' या गाण्यात अभिषेकबरोबर वहिदा आधुनिक शैलीत नाचली आहे. हे गाणे पारंपरिक असले तरी अभिषेकच्या स्टायलीत वहिदा नाचत त्याच्याकडे जे कौतुकाने आणि आनंदाने पाहते, ते केवळ अपूर्व आहे. (Waheeda Rehman)

खुल्या मनाने बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती वहिदाकडे असल्यामुळे ती आज 85 वर्षांची असली, तरी कालबाह्य वाटत नाही. वहिदा ही चेन्नईची. वडील आयएएस ऑफिसर असल्यामुळे घरातले वातावरण आधुनिक व उदारमतवादी होते. त्यामुळे त्या काळातली मुस्लिम मुलगी असूनही वहिदाला घरच्यांनी भरतनाट्यम् शिकण्यास आणि नृत्याचे कार्यक्रम करण्यासही परवानगी दिली. 'कोणतेही काम किंवा कला ही वाईट नसते. इन्सान बुरा हो सकता है.' ही वडिलांची शिकवण होती. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी हे एकदा चिमुरड्या वहिदाचे नृत्य पाहून प्रभावित झाले होते. तिचे हे नृत्य पाहून तिला तामिळ व तेलुगू चित्रपट मिळाले. परंतु चित्रपटांचा प्रस्ताव आला, तेव्हा तिच्या आईने खूप विरोध केला. तेव्हा वहिदाचे वडील हयात नव्हते. शेवटी आई तयार झाली. वहिदा नृत्य करत होतीच, त्यामुळे कायिक आणि वाचिक दोन्ही अभिनयांत ती माहीर होती.

वहिदाला व्हायचे होते डॉक्टर; पण पोरवयात ती स्वतःच इतक्यावेळा आजारी पडायची की, 'तूच अंथरुणाला खिळून असशील तर पेशंट तुझ्याकडे कसे येतील?' असे वडील विचारत. पण तरीही मेडिकल जर्नल्स वाचण्याची सवय वहिदाने आजतागायत कायम ठेवली आहे. 'रोजुलू मराई' या तेलुगूपटातील वहिदाचे पडद्यावरचे गाणी इतके लोकप्रिय झाले की, लोक थिएटरमध्येच पडद्यावर पैसे फेकत. एकदा गुरुदत्त हैदराबादेत आपल्या वितरक मित्राला भेटायला आला असताना बाहेर खूपच गडबड सुरू होती. गुरुदत्तने हा काय प्रकार आहे, असे विचारल्यावर त्याने 'रोजुल'चा उल्लेख केला आणि हा चित्रपट व त्यातील वहिदाचे गाणे प्रेक्षकांना जाम आवडल्याचा त्याने उल्लेख केला. तेव्हा गुरुदत्तने वहिदाला बोलावून घेतले. तिला उर्दू भाषा अवगत आहे, हे कळल्यावर गुरुदत्तने सुस्कारा सोडला. त्यावेळी गुरुदत्तला नवीन चेहरा हवाच होता. गुरुदत्तने वहिदाला मुंबईला बोलावून घेतल्यावर, इतक्या दूर कसे जायचे? असा प्रश्न रेहमान कुटुंबास पडला. वहिदा आई व बहिणीबरोबर मुंबईला आली.

'सीआयडी' या पहिल्याच चित्रपटात वहिदाने नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारली. 'तुझे नाव फार लांबलचक आहे, ते आकर्षक नाही.' असे गुरुदत्तने सांगूनही वहिदाने ठामपणे आपले नाव न बदलण्याची भूमिका घेतली. या चित्रपटाच्या वेळीच 'मला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटेल, असेच कपडे मी घालीन.' अशी अट तिने दिग्दर्शक राज खोसलाला घातली होती. गुरुदत्त हा 'सीआयडी'चा निर्माता होता; पण तो फारसा आग्रही नसे. खोसलाला मात्र वहिदाचा खूप राग आला होता. त्यानंतरच्या 'सोलहवा साल' या चित्रपटात नायक-नायिका भिजतात, असे द़ृश्य आहे. त्यावेळी ते आपले कपडे बदलतात आणि तेव्हा नायक तिला 'आपका नाम लाजवंती है, इसीलिए आपको लाज आती है.' असे म्हणतो. तेव्हा दिग्दर्शक खोसलाने वहिदाला पाठ उघडी दाखवणारे तंग कपडे घालायला सांगितले होते. तेव्हा, 'हे कपडे मी घालणार नाही,' असे वहिदाने सांगितले. (Waheeda Rehman)

नायिका लाजरीबुजरी असल्याचा उल्लेख संवादात असल्याचा युक्तिवादही तिने केला. तोवर 'प्यासा' हा वहिदाचा चित्रपट हिट झाला होता. त्याचा उल्लेख करून खोसला म्हणाला की, 'वहिदा, यश तुझ्या डोक्यात गेलेलं दिसतंय. आप डायरेक्टर को सीन और उसका लॉजिक समझाएँगी?' असा संतप्त सवालही त्याने वहिदाला केला. मग देव आनंदने मध्यस्थी केली आणि सर्व काही सुरळीत झाले. देव हा गुरुदत्तचा 'प्रभातप'पासूनचा दोस्त. पहिल्यांदा वहिदा देवला भेटली, तेव्हा मुळातच आपल्या लाडक्या हिरोबरोबर काम करायला मिळणार यामुळे ती खूप खूश होती. परंतु देवला तिने 'देवसाब' अशी हाक मारायला सुरुवात केली, तेव्हा 'मला फक्त देव असंच म्हणायचं,' अशी आग्रहाची सूचना त्याने केली. वहिदाला आजही देवच्या 'गाईड' चित्रपटातील रोझी म्हणून ओळखली जाते. मात्र, हा चित्रपट अगोदर राज खोसला दिग्दर्शित करणार असल्यामुळे वहिदाने तो नाकारला होता.

रोझीसाठी खोसलाने अन्य नायिकांचा विचार केला, तेव्हा देवने 'माझी रोझी वहिदाच असेल.' असे सुनावले. शेवटी विजय आनंदकडे 'गाईड'चे दिग्दर्शन आले. विजय हा 'सीआयडी'च्या सेटवर येत असे, तसेच 'काला बाज़ार'चे दिग्दर्शन त्याने केले असल्यामुळे वहिदाशी त्याची चांगलीच मैत्री होती. त्यामुळे वहिदाने साहजिकच चित्रपट स्वीकारला. 'गाईड' हा काळाच्या पुढे जाणारा चित्रपट होता. रोझीच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे, तिच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आणि सुखदुःखांच्या छटा या वहिदासारख्या अभिनेत्रीला आव्हानात्मक वाटल्या आणि ही भूमिका ती अक्षरशः जगली. गुरुदत्तच्या 'प्यासा', 'कागज़ के फूल', 'साहिब, बीबी और ग़ुलाम' आणि 'चौदहवीं का चाँद' यांसारख्या चित्रपटांमुळे एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून तिचे नाव अगोदरच झाले होते.

गुरुदत्तने वहिदामध्ये आपले प्रेम शोधले. मात्र, त्या प्रेमाचा शेवट सुखान्त होणार नव्हता, हे गुरुदत्त, वहिदा आणि गीता दत्त या तिघांनाही माहीत होते. गुरुदत्तने वहिदाला आपल्या प्रेमात बांधून ठेवले नाही आणि गुरुदत्त फिल्म कम्बाईन्सच्या बाहेरही काम करण्यास तिला परवानगी दिली. तरीदेखील ती अनेक चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स नाकारायची. फणीश्वरनाथ रेणू यांच्या 'मारे गये गुलफाम' या कथेवर आधारित 'तिसरी कसम' वहिदाने सुरुवातीला उगाचच नाकारला होता. तो चित्रपट गीतकार शैलेंद्रने निर्माण केला होता आणि 'ही ऑफर तू स्वीकार,' असे गुरुदत्तने वहिदाला सांगितले होते. मात्र 'कागज़ के फूल'च्या अपयशानंतर गुरुदत्तने आणि 'तिसरी कसम' फ्लॉप झाल्यानंतर शैलेंद्रने आत्महत्या केली. 'तिसरी कसम'च्या शूटिंगसाठी रतलामजवळ ट्रेनने जाता-येता राज कपूर आणि वहिदा फॅन्सना भेटले नाहीत म्हणून चाहत्यांनी जोरदार दगडफेक केली होती आणि लोखंडाच्या पहारींनी रेल्वेच्या काचाही फोडून टाकल्या होत्या. 'मुझे जिने दो'चे शूटिंग चंबळच्या खोर्‍यात सुरू असताना, जवळून डाकू जात असल्यामुळे सुनील दत्तने शूटिंगला आलेली नर्गिस तसेच नायिका वहिदाला तंबूत जाऊन लपण्यास सांगितले होते. (Waheeda Rehman)

सत्यजित राय यांचा 'अभियान', असित सेन यांचा 'खामोशी' किंवा 'बीस साल बाद', 'कोहरा', 'राम और श्याम', 'नीलकमल', 'आदमी, रेशमा और शेरा', 'प्रेमपुजारी', 'कभी कभी' हे वहिदाचे महत्त्वाचे चित्रपट. चरित्र अभिनेत्री म्हणूनही 'त्रिशूल', 'लम्हे', 'रंग दे बसंती', '15 पार्क व्हेन्यू', 'स्वयम्', 'मैंने गांधी को नहीं मारा' हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. कोणतीही तडजोड न करता, चित्रपटसृष्टीत टिकून राहणारी 'मॅजेस्टिक लेडी' म्हणून वहिदा ओळखली जाते. अगोदर 'नवकेतन फिल्म्स'मध्ये असलेले यश जोहर (करण जोहरचे वडील) यांच्यामुळे वहिदाची भावी पती कमलजीतशी (शशी रेखी) ओळख झाली. त्याच्याबरोबर तिने 'शगुन' या चित्रपटात काम केले. पुढे तो उद्योग-व्यवसायात यशस्वी झाला आणि वहिदानेदेखील 'ब्रेकफास्ट सिरीयल'सारख्या उत्पादनांचा व्यवसाय केला.

वहिदाने लहानपणी 'गॉन विथ द विंड' पाहिला होता आणि त्या सिनेमासारखे आपल्या घरात उंच पांढरे खांब असतील, असे स्वप्न तिने पाहिले आणि ते पूर्णही केले. लहानपणी 'झिनत' या चित्रपटातील मृत्यूचा प्रसंग पहून ती इतकी हमसाहमशी रडत होती की, तिला आवरणे मुश्कील झाले होते… पहिल्या चित्रपटाच्या वेळी वहिदाला दरमहा 2500 रुपये पगार मिळत होता. मुंबईत न्यू एम्पायर वा रिगलमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट ती बघत असे. मरीन ड्राईव्हवर फरचा कोट घालून हिंडणारे पारसी बाबा बघून तिला मजा वाटायची. शम्मी, हेलन, नंदा, आशा पारेख आणि वहिदा मिळून वर्षानुवर्षे सिनेमे बघणे, हॉटेलिंग करणे, फॉरेन ट्रिपला जाणे या गोष्टी करत असत. आयुष्याच्या बकेट लिस्टमधली स्कुबा डायव्हिंग करण्याची तिची इच्छा अद्याप बहुतेक पूर्ण व्हायची आहे. 'आयुष्यात बुरी गंदी चीजें आहेत; पण मी फक्त सुंदरच गोष्टी पाहिल्या आणि त्यांचा आनंद घेतला.' असे वहिदा सांगते.

या 'चौदहवीं का चाँद'वर मात्र एकही डाग नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT