Latest

ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे किती महत्त्वाचं आहे? काय सांगते परिवा प्रणती अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वागले की दुनिया – नई पिढी, नये किस्से ही सोनी सबवरील एक विचारशील कौटुंबिक मालिका आहे. त्यातून सामान्य लोकांचे आयुष्य आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यातील पात्रे आपल्याशी साधर्म्य साधतात, आयुष्यभराचे धडे देतात. एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मालिकेने स्तनांच्या कर्करोगावर प्रकाशझोत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या आजाराबाबत जागरुकता निर्माण करून त्या संबंधीची अस्वस्थता आणि कलंकला आव्हान दिले जात आहे.

एका हृदयस्पर्शी संवादात वंदनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिवा प्रणतीने आपल्या पात्राच्या स्तनांच्या कर्करोगाच्या निदानाविषयी संघर्षाबाबत चर्चा केली. अशा नाजूक विषयावर ही मालिका किती सहानुभूती आणि धैर्याने काम करत आहे, ते त्यांनी सांगितले. यामागे चर्चा आणि प्राथमिक अवस्थेतच निदानाचे महत्त्व कळण्यात प्रेक्षकांना मदत व्हावी, हा हेतू आहे.

या मालिकेत वंदना पात्र स्तनांच्या कर्करोगाशी झगडताना दिसत आहे. मालिकेतील या कथासूत्राबाबत ती म्हणाली, स्तनांचा कर्करोग हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. जेव्हा यासारखा मुद्दा आपण टीव्हीवर दाखवत असतो तेव्हा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते, याची मला जाणीव आहे. मी वंदना म्हणून हा अनुभव घेत आहे. ज्या महिला स्तनांच्या कर्करोगातून गेल्या आहेत, त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटते. या आजाराशी झगडणाऱ्या इतर महिलांनाही तिचा प्रवास प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे. जेणेकरून त्या बोलू लागतील अन् खुलेपणाने आपले अनुभव आणि भावना कुटुंबांसोबत शेअर करू शकतील. असे मोठे आव्हान पेलत असताना बोलणे आणि गुप्तता न बाळगणे यातून खूप मोठा बदल होऊ शकतो.

कर्करोगाला सामोरे जात असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारणे खूपच कठीण असू शकते. यासाठी वंदनाने स्वत:ला कशा प्रकारे तयार केले? याविषयी ती म्हणते- हा खूप खडतर प्रवास आहे. मला मालिकेचे कथानक आणि त्या व्यक्तिरेखेला न्याय द्यायचा होता.  भावनिकरीत्या मी त्या पात्राच्या भावना आणि भीतीला स्वत:शी जोडण्यावर काम केले. यातून मला स्तनांच्या कर्करोगाने बाधित असलेल्या व्यक्तींच्या वास्तविक अनुभवांप्रती सहानुभूती बाळगण्याची संधी मिळाली. पात्राची तीव्रता आणि आम्हाला जो संदेश द्यायचा आहे, त्याच्यात संतुलन साधणे खूप महत्त्वाचे होते. परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देत प्रामाणिकपणे अभिनय करण्याच्या दृष्टीने मी खूप मेहनत घेतली.

या मालिकेत स्तनांच्या कर्करोगाविरुद्ध वंदनाचा परिवार आणि मित्रमंडळी तिला खूप पाठबळ देतात. ते तिला कशा प्रकारे मजबूत करतात, याबद्दल ती म्हणते- आपण जेव्हा अशा बिकट परिस्थितीतून जात असतो तेव्हा आपल्या प्रियजनांकडून भावनिक पाठबळ मिळणे हे किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला माहितच आहे. या मालिकेतील वागळेंच्या कुटुंबाची वीण ही अत्यंत घट्ट आहे. जेव्हा वंदना स्तनांच्या कर्करोगाला सामोरे जाते तेव्हा त्यातील प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पुढाकार घेतो. वंदनाचा पती राजेश तिच्यासाठी आधारवड बनतो. या संघर्षाच्या क्षणी तिला सावरण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी तो सदैव सज्ज असतो. यासोबतच तिची मुले अगदी तरुण वयातही अद्भूत लवचिकता आणि समंजसपणा दाखवतात. इतकेच नव्हे तर तिच्याशी एकजूट दाखवण्यासाठी तिचे सासू-सासरे आणि परिसरातील समुदायही एकत्र येतात. अशा आव्हानात्मक काळात आपल्या प्रियजनांच्या पाठिंब्याचे हे वर्तुळ खूप काही बदल घडवून आणू शकते, असे मला वाटते.

आव्हानात्मक प्रसंगाविषयी ती म्हणाली-मालिकेतील कथानकादरम्यान भावभावनांनी ओसंडून वाहणारी काही अत्यंत कठीण दृश्ये आणि क्षण आहेत. उदाहरणार्थ – जेव्हा वंदनाला ही माहिती कुटुंबीयांना सांगायची असते तेव्हा. त्यांच्या हृदयाला कसा झटका बसतो, हे आपल्यालाही जाणवू शकते. जेव्हा उपचारांदरम्यान वंदना थरथरू लागते तो क्षण खूपच हृदयविदारक असतो. मात्र बहुतांशपणे सर्वात आव्हानात्मक भाग तो आहे जेव्हा तिचे पहिल्यांदा निदान होते. जेव्हा प्रत्यक्षातील खऱ्याखुऱ्या व्यक्तीला अशी आयुष्य बदलून टाकणारी बातमी मिळते तेव्हा भीती आण्धि अनिश्चिततेच्या मुळाशी खोलवर जाण्याची गरज भासते. पडद्यावर हा प्रवास जिवंतपणे अनुभवल्यानंतर स्तनांच्या कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल मला खूप सखोलपणे समज आली आहे. त्यातील विविध उपचार पद्धतींचे पर्याय त्याचा रुग्णांवर अतिप्रचंड प्रमाणात शारीरिक आणि भावनिक परिणाम होतो, हेही कळून चुकले आहे. ही भूमिका माझ्यासाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला आहे. अशा दुर्धर आजारांतून जात असलेल्या लोकांप्रती माझ्या मनात प्रचंड सहानुभूती आणि जागरुकता वाढली आहे.

'वागळे की दुनिया' मालिकेचा हिस्सा बनणे हा एक अर्थपूर्ण अनभव आहे. कारण ही मालिका विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधते आणि त्यांच्याबद्दल प्रेक्षकांत जागरुकता निर्माण करते. दूरचित्रवाणीची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातील आशयामध्ये प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करण्याची क्षमता आहे. यातून त्यांना पुढाकार घेऊन समाजात बदल घडवून आणण्याची प्रेरणाही मिळते.

आजही खूप लोकांना स्तनांच्या कर्करोगाबद्दल बोलताना खूप लाजिरवाणे वाटते. आपल्याला कुणी काय समजेल, याबद्दल एक भय आणि संकोच आहे. यातून खूप मोठ्या समस्या उद्भवू शकतात. उपचारांत जरासाही विलंब झाल्यास हा आजार भयंकर वेगाने शरीरात पसरू शकतो. वंदनाची कथा दाखवून कर्करोगात लवकर निदान होणे किती महत्त्वाचे आहे, हे आम्ही लोकांच्या मनावर ठसवू इच्छितो.

महिलांनी नियमित तपासणी आणि स्क्रिनिंगला जायला हवे. कारण लवकर स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले तर तुमचा जीव वाचू शकतो. अशा अत्यंत कर्मकठीण परिस्थितीला सामोरे जात असताना तुमचे कुटुंब आणि इष्टमित्रांचा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरत असतो. अशा आरोग्यविषयक समस्यांवर आपण नि:संकोचपणे बोलायला सुरुवात करू तेव्हा कित्येक जणांचे प्राण वाचवण्यात मदत होईल. तसेच ते रुग्ण यातून जात आहेत, त्यांच्यासाठीही काही गोष्टी चांगल्या घडतील. तर मग… आपले सर्व भय आणि लोकलज्जेला फाटा द्या आणि नि:संकोचपणे ब्रेस्ट कॅन्सरवर बोलायला लागा, अशी परिवा प्रणती म्हणाली.

SCROLL FOR NEXT