राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि. 19) मतदान होत आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, 82 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रक्रियेसाठी 720 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नीलकंठ करे यांनी दिली.
राधानगरी आणि करवीर तालुका कार्यक्षेत्र असणार्या 58 गावांमध्ये 27,165 उत्पादक, तर 495 संस्था गट मतदार आहेत. राधानगरी तालुक्यामध्ये 42, तर करवीर तालुक्यामध्ये 40 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. प्रत्येककेंद्रावर 7 ते 8 कर्मचारी तैनात केले आहेत.
'भोगावती'साठी तिरंगी लढत होत असून,सतारूढ आमदार पी. एन. पाटील गटाशी राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी आघाडी केली आहे. ते राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत; तर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, हंबीरराव पाटील, जालंदर पाटील, अजित पाटील यांची भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानीची शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीही रिंगणात आहे. माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांची तिसरी आघाडीही रिंगणात आहे.
सोमवारी (दि. 20) कसबा बावडा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी 36 टेबलवर मतमोजणी होणार असून, तीनशे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायंकाळी 6 पर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने तयारी करण्यात आली आहे.
फुटीर मतदानाची शक्यता?
'भोगावती'ची निवडणूक तिरंगी होत असून, तिन्ही पॅनेल, आघाड्यांमध्ये पै-पाहुणे, नातलगांची उमेदवारी आहे. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान 50 टक्केच होईल, तर उर्वरित मतदान फुटीर होण्याची शक्यता आहे.