Latest

पुणे बाजार समितीसाठी ७२.२८ टक्के मतदान, ग्रामपंचायत मतदार संघात सर्वाधिक ९३.६८ टक्के मतदान

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी १८ जागांसाठी सुमारे ७२.२८ टक्क्यांइतके चुरशीने मतदान झाले. एकूण १७ हजार ८१२ मतदारांपैकी १२ हजार ८७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजल्यापासून तीनही मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने मतदानास सुरुवात झाली. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण तीन ठिकाणच्या 31 मतदान केंद्रावर सकाळच्या पहिल्या टप्प्यापासूनच मतदानासाठी सर्वच गटातील मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

विकास सोसायटीच्या 4 मतदान केंद्रांवर आणि ग्रामपंचायतीसाठीच्या 2 मतदान केंद्रावर मतदान झाले. या दोन्ही मतदार संघाचे मतदान अरण्येश्वर-तळजाई रोडवरील श्री संदिप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले. व्यापारी-आडते मतदार संघातील मतदान हे शुक्रवार पेठ येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल झाले. तर हमाल-मापाडी मतदार संघाचे मतदान मार्केट यार्डातील हमाल भवन येथे 3 मतदान केंद्रावर झाले. सायंकाळी ५ वाजता मतदान संपले आणि त्यानंतर एकूण मतदानाची टक्केवारीची माहिती उपलब्ध झाली.

विकास सोसायटी मतदार संघात 11 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 1 हजार 918 आहे. त्यापैकी १ हजार ७०० मतदान (८८.६३ टक्के) झाले. ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 713 आहे. त्यापैकी ६६८ मतदान (९३.६८ टक्के) मतदान झाले. मतदानाचा सर्वाधिक टक्का ग्रामपंचायत मतदार संघात दिसून आला आहे.

आडते-व्यापारी मतदार संघातील 2 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून मतदारांची सर्वाधिक म्हणजे 13 हजार 174 इतकी संख्या आहे. यापैकी ८ हजार ७०५ (६६ टक्के) इतके मतदान झाले. तर हमाल-मापाडी मतदार संघाच्या 1 जागेसाठी 5 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 2007 इतकी आहे. त्यापैकी १ हजार ८०३ ( ८९.८३ टक्के) मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली. शनिवारी (दि.२९) सकाळी ८ वाजल्यापासून मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT