Latest

राजाराम कारखाना निवडणूक : विजयाचा गुलाल कोण उधळणार? उत्कंठा शिगेला, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

मोहन कारंडे

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज, (मंगळवार, दि. 25) होत असून, अतिशय ईर्ष्येने आणि चुरशीने झालेल्या मतदानामुळे उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये सभासद कोणाचा 'कंडका पाडणार' आणि विजयी गुलाल कोण उधळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे केले जात असून, गावोगावी निकालाबाबत पैजा लागल्या आहेत.

सात तालुक्यांतील 122 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याच्या यावेळच्या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधले आहे. मतदार पात्र-अपात्रतेपासून सुरू झालेली इर्ष्या मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. अटीतटीने झालेल्या मतदानानंतर सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांकडून गावोगावच्या मतदानाची माहिती घेत आकड्यांचा मेळ घातला गेला. यानंतर समाजमाध्यमांद्वारे विजयाचे दावे करण्यात आले आहेत. गावो-गावच्या समर्थकांमध्ये पैजा लागल्या आहेत. सत्ताधारी गटाकडून 'अहं 21-0' अशी तर विरोधी गटाकडून 'कंडका पडणार'च अशी पोस्ट समाज माध्यमात फिरत आहे.

सर्वात प्रथम निकाल जाहीर होत असलेल्या संस्था गटात 129 पैकी 128 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान सत्ताधारी गटाकडून पांढर्‍या टोप्या परिधान केलेले 90 हून अधिक मतदार आणल्याचा दावा करण्यात आला होता तर विरोधी परिवर्तन आघाडीकडून फेटे बांधलेले 70 हून अधिक मतदार आणल्याचा दावा केला गेला. दोन्हीकडून दावा करण्यात आलेला आकडा 160 वर जातो. प्रत्यक्ष मतदानच 128 झाले आहे. सर्वप्रथम निकाल जाहीर होत असलेल्या आणि प्रतिष्ठेच्या या गटात बाजी कोण मारणार याची उत्कंठा वाढली आहे.

पहिल्या टप्प्यात मतमोजणी होत असलेल्या गावांपैकी सर्वात जास्त मतदान अनुक्रमे टोप, वडणगे, शिये, नरंदे, कुंभोज, पेठवडगाव, रूकडी, निगवे, मौजे वडगाव या गावांमध्ये आहे. दुसर्‍या टप्प्यात मतमोजणी होत असलेल्या गावांपैकी सर्वात जास्त मतदान कसबा बावडा, पुलाची शिरोली, वाशी, साळवण, करवीर, उचगाव, कांडगाव, वसगडे, राधानगरी, कळंबे या गावांमध्ये आहे.

दुसर्‍या फेरीची मतमोजणी निम्म्यावर आल्यानंतरच कल स्पष्ट

पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणी होत असलेल्या कसबा बावडा, पुलाची शिरोली, वाशी, साळवण, करवीर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्‍यानंतर आणि दुसर्‍या फेरीची मतमोजणी निम्म्यावर आल्यानंतरच निवडणुकीचा कल स्पष्ट होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT